पिरनवाडी नाका ते विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठ (व्हीटीयू) पर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरणाचे काम अखेर सुरू झाले आहे. तथापि रुंदीकरण किती फुटाचे होणार याबाबत पिरनवाडी आणि परिसरातील नागरिकांमध्ये अद्याप संभ्रमाचे वातावरण आहे.
गेल्या कांही महिन्यांपासून पिरनवाडी ते व्हीटीयुपर्यंतच्या रस्ता रुंदीकरणासाठी हालचाली सुरू होत्या. त्यासाठी कांही भागात जेसीबीद्वारे सपाटीकरणही करण्यात आले होते. तथापि पिरनवाडीतील व्यापारी आणि ग्रामस्थांनी विरोध दर्शविल्यामुळे कांही दिवस हे काम बंद ठेवण्यात आले होते. आता दोन दिवसांपासून सदर रस्त्याचे रुंदीकरणाचे काम वेगाने हाती घेण्यात आले आहे. रस्ता रुंदीकरणाला प्रारंभ झाल्यामुळे रस्त्यालगतच्या दुकानदार व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पिरनवाडी येथील रस्ता 110 फुटाचा केल्यास व्यापारी व नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असल्याने त्यांची चिंता वाढली आहे. नागरिकांचे अधिक नुकसान होऊ नये यासाठी 60 फुटाचा रस्ता करावा, अशी मागणी प्रारंभापासून केली जात आहे. तसेच रस्ता रुंदीकरण प्रकल्प राबविण्यापूर्वी नागरिकांना विश्वासात घेणे गरजेचे होते अशी प्रतिक्रियाही व्यक्त होत होती. तथापि कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता सार्वजनिक बांधकाम खात्याकडून चार महिन्यापूर्वी भूमिपूजन करण्यात आले होते.
रस्त्याचे रुंदीकरण 140 फुटापर्यंत करण्यास विरोध दर्शविताना पिरनवाडी भागातील व्यापारी वर्गाने सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. त्यावेळी
140 ऐवजी 70 फुटाचा रस्ता करावा, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र अधिकाऱ्यांनी 140 ऐवजी 110 फुटाचा रस्ता करण्याबाबत विचार केला जाईल, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार आता पिरनवाडी येथील रस्ता 110 फुट रुंद केला जाणार असल्याचे समजते.