‘ऑपरेशन मदत’ चे कार्यकर्ते दुर्गम भागातील खेडोपाडी व धनगरवाड्यावर जाऊन शैक्षणिक साहित्याची मदत देऊन तेथील मागासलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ग्रामीण शिक्षण अभियानांतर्गत प्रयत्न करत आहेत.
त्यानुसार चंदगड तालुक्यातील घनदाट जंगलात असणाऱ्या जंगमहट्टी धनगर वाड्यावरील सरकारी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना भेटून त्यांच्याशी संवाद साधला व त्यांच्यात शिक्षणाची ओढ लागावी म्हणून त्यासर्वांना वह्या, पेन, पेन्सिली, खोडरबर, शार्पनर असे साहित्य दिले.
स्थानिक शाळेसाठी 1 ग्रीन चाॅकबोर्ड, 1 डस्टर व 1 जंबो चाॅकबाॅक्स शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष लक्ष्मण शेळके व शिक्षक कांबळे सरांकडे सुपुर्द करण्यात आले. याप्रसंगी आनंद कांबळे सरांनी प्रास्ताविक केले, कॅंटोन्मेंट बोर्ड प्रायमरी स्कूलचे मुख्याध्यापक प्रशांत बिर्जें सरांनी ‘ऑपरेशन मदत’ तर्फे ग्रामीण शिक्षण अभियान कसे राबविण्यात येते याबद्दल थोडक्यात माहिती उपस्थितांना दिली व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला डाॅ. केतकी पावसकर, डाॅ. शंतनु पावसकर, दिपक ओऊळकर, भालचंद्र पाटील, गजानन साबन्नवर, चेतन शहा व महेश जाधव यांनी मदत केली. यावेळी प्रसाद हुली, जगदीश गस्ती, गौतम श्रौफ व संजय साबळे यां मान्यवरांनी मोलाची मदत केली.
या कार्यक्रमाला खासकरून स्वराज्य बिर्जे (3 वर्षे ते), शार्दुल साबळे, विहान पाटील सिद्धु हगरन्नवर आर्या साबळे व सुप्रीता हगरन्नवर (13 वर्षे) या छोट्यांनी उपस्थिती लावून रंगत आणली. राहुल पाटील यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की दिलेल्या पेंन्सीलींच्या टोकाला एका (भाजीपाला, फळ किंवा फुल) रोपांची बी आहे, ती जमिनीत रुजवल्यास एक रोपटे तयार होईल व त्यास फुले व फळे येतील. त्याचप्रमाणे येणाऱ्या पुढील काळात सेंद्रिय शेतीचे महत्व ओळखून आपणही त्यानुसार शेतात लागवड केली पाहिजे.