उत्तर कर्नाटकात पुन्हा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून वायव्य शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी राजकीय उपक्रमांना वेग आला आहे. या निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची घोषणा केली असली तरी त्याबद्दल भाजप नेत्यांमध्ये नाराजी आहे. दुसरीकडे काँग्रेस पक्ष आपला उमेदवार निश्चित करण्यासाठी अद्याप चाचपडत आहे.
विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या या दोन जागांची निवडणूक येत्या मे महिन्यात होण्याची शक्यता असून एप्रिल मध्यावधीला निवडणूक आचारसंहिता लागू होऊ शकते. सत्ताधारी भाजप पक्षाने शिक्षक मतदारसंघात विद्यमान आमदार अरुण शहापूरकर आणि पदवीधर मतदारसंघात हनुमंत निराणी यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे. काँग्रेस पक्षाने मात्र अद्याप आपले उमेदवार जाहीर केलेले नाहीत. तथापि पक्षाचे बागलकोटचे एन. बी. बन्नुर, चिकोडीचे माजी मंत्री प्रकाश हुक्केरी आणि संगमेश बबलेश्वर हे शिक्षक मतदारसंघातून उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. त्यामुळे या मातब्बर इच्छुकांमधून अंतिम उमेदवार निश्चित करणे ही काँग्रेस हायकमांडसाठी डोकेदुखी झाली आहे.
वायव्य शिक्षक मतदारसंघातून दोन वेळा निवडणूक लढविणार्या एन. बी. बन्नुर यांना अत्यंत कमी मताने पराभव पत्करावा लागला होता. यावेळी पुन्हा ते कडवी झुंज देऊन कोणत्याही परिस्थितीत निवडणूक जिंकण्यासाठी सिद्ध झाले आहेत. महत्त्वाचे म्हणजे केपीसीसी शिक्षक विभागाचे सेक्रेटरी असणारे बन्नुर हे विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांच्या गटाचे आहेत. त्यामुळे सिद्धरामय्या यांची उमेदवारीसाठी बन्नुर यांनाच पसंती असणार हे निश्चित आहे. सिद्धरामय्या यांच्या पाठिंब्यामुळे एन. बी. बन्नुर यांनी यापूर्वीच प्रचाराची पहिली फेरी पूर्ण केली असून पक्षाचे तिकीट आपल्यालाच मिळणार असा त्यांचा ठाम विश्वास आहे.
दुसरीकडे चार वेळा आमदार, एकदा मंत्री आणि एकदा खासदार राहिलेले ज्येष्ठ काँग्रेस नेते प्रकाश हुक्केरी हे देखील उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. आपल्या उमेदवारीला पाठिंबा मिळावा यासाठी त्यांनी बेळगाव, बागलकोट आणि विजयपुरा येथील उच्च शैक्षणिक संस्थांना पटवण्यावर भर दिला आहे. त्याचप्रमाणे माजी मंत्री एम. बी. पाटील यांनी उमेदवारीसाठी संगमेश बबलेश्वर यांना पाठिंबा दर्शविला आहे.
दरम्यान अरुण शहापूरकर यांना पुन्हा उमेदवारी दिल्याबद्दल भाजप गोटात विभिन्न प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत. तीन वेळा निवडून येऊन देखील आमदार अरुण शहापूरकर यांनी शिक्षकांच्या हितासाठी कोणतेच कार्य केले नसल्याची भावना सर्वांमध्ये असल्यामुळे त्यांच्या उमेदवारीबद्दल नाराजी व्यक्त होत आहे. अलीकडेच कर्नाटक राज्य माध्यमिक शाळा शिक्षक संघटनेचे उपाध्यक्ष रामू गुगवाड यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत कोणत्याही परिस्थितीत यावेळी शहापूरकर यांना तिकीट देऊ नये असा स्पष्ट संदेश देण्यात आला आहे. शिक्षकांचा एक मोठा गट सध्या रामू गुगवाड अथवा माजी राज्यसभा सदस्य डॉ. प्रभाकर कोरे यांच्या कन्या प्रीती दोदवाड यांना भाजपची उमेदवारी मिळावी यासाठी झगडत आहे. भाजपने त्यांना तिकीट दिले नाही तर ते अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याची शक्यता आहे.