मुजराई खात्याअंतर्गत येणाऱ्या राज्यातील सर्व मंदिरांनी हिंदू नववर्षाचा पहिला दिवस उगादी अर्थात गुढीपाडवा हा ‘धार्मिक दिन’ म्हणून साजरा करावा, अशी सुचना राज्यसरकारने केल्यामुळे कर्नाटक मुजराई खात्याच्या मंत्री शशिकला ज्वोल्ले त्यादिवशी विशेष पूजा विधी करणार आहेत.
सरकारच्या सूचनेनुसार गुढीपाडव्यादिवशी सर्व अधिकृत मंदिरांमध्ये भारतीय संस्कृतीनुसार कार्यक्रमांचे आयोजन केले जावे. हिंदू संस्कृती जनजागृती बाबतचे प्रयत्न संबंधित कार्यक्रमांमध्ये दिसून आले पाहिजेत, असे मंत्री शशिकला ज्वोल्ले यांनी सांगितले.
राज्याचा विकास आणि भरभराटीसाठी प्रत्येक मंदिरामध्ये विशेष प्रार्थनेचे आयोजन करण्यास सांगण्यात आले आहे. त्या अनुषंगाने निपाणी तालुक्यातील श्री विरुपाक्षलिंगय्या समाधी मठामध्ये विशेष पूजा आयोजित करण्यात आली आहे.
प. पू. श्री सिद्धेश्वर महास्वामी आणि कणेरी मठाचे प. पू. श्री अदृश्य काडसिद्धेश्वर महास्वामी यांच्या दिव्य सानिध्यात होणाऱ्या या पूजा विधीप्रसंगी मुजराई खात्याच्या मंत्री शशिकला ज्वोल्ले खास उपस्थित राहणार आहेत. यासंदर्भात बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी एक आदेशही काढला आहे.