सध्या नागराज मंजुळेचा झुंड हा चित्रपट चर्चेत असून त्याला प्रेक्षकांचा देखील चांगला प्रतिसाद लाभत आहे.या चित्रपटाचे वैशिष्ठ म्हणजे या चित्रपटाचे बेळगाव कनेक्शन देखील आहे.
चित्रपटाच्या प्रोडक्शन डिझाईनची जबाबदारी समर्थपणे पार पाडलेले पंकज शिवदास पोळ आणि त्यांच्या पत्नी स्निग्धा यांचे त्यांच्या कामाबद्दल कौतुक होत आहे.पंकज पोळ हे मूळचे बेळगावचे असून झुंड पर्यंतचा त्यांचा प्रवास संघर्षमय आहे.अनेक अडचणी आणि समस्या यांना तोंड देत पंकज यांनी झुंड पर्यंतची वाटचाल यशस्वी केली आहे.
पंकज पोळ यांचा प्रवास संघर्षाने भरलेला असला तरी तो निश्चितच शून्यातून सुरुवात करणाऱ्या तरुणांना प्रेरणादायी आहे असेच म्हणावे लागेल.पंकज यांचा जन्म बेळगावच.शिक्षणही बेळगावात झाले.आर्थिक स्थिती बेताची असल्याने पंकज ना अकरावी नंतर शिक्षणाला राम राम करावा लागला.घराला हातभार लावण्यासाठी त्यांनी आजूबाजूच्या गावात फिरून चहा पूड विक्री करण्यास प्रारंभ केला.
पंकजची कष्ट करायची वृत्ती पाहून त्यांना मुंबईत राहणाऱ्या बहिणीने मुंबईला बोलावून घेतले.त्यांच्या भाऊजींचा चित्रपट क्षेत्रात संपर्क असल्याने पंकज यांना आर्ट डिपार्टमेंट मध्ये मजुराची नोकरी त्यांनी प्रारंभी लावली.२००२ मध्ये गंगाजल चित्रपटाच्या कामापासून पंकज यांनी सुरुवात केली आणि नंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही.
लवकरच पंकज यांचे काम पाहून त्यांना सुपरवायजर पदी बढती देण्यात आली.त्याच वेळी असिस्टंट आर्ट डायरेक्टर म्हणून देखील पंकजनी काम करायला सुरुवात केली.हे काम करताना बाहेरची देखील जाहिराती आणि चित्रपटांची कामे घेण्यास प्रारंभ केला.अनेक नामवंत आर्ट डायरेक्टर बरोबर काम केल्यामुळे चांगला अनुभव पंकज यांना लाभला.नंतर धाडस करून त्यांनी स्वतः स्वतंत्रपणे आर्ट डायरेक्टर म्हणून काम करण्यास प्रारंभ केला .
यशराज फिल्म्स,सिप्पी फिल्म्स, डिस्ने ,चॅनेल व्हीं,एम टी व्हि यांचे स्वतंत्रपणे काम केले.या कामात पत्नी स्निग्धा यांची देखील प्रतेक पावलावर साथ लाभली.पती पत्नी दोघांनी मिळून तीनशे हून अधिक वेगवेगळ्या कामाची आर्ट डायरेक्टर म्हणून जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आहे.