Monday, December 30, 2024

/

जीवनाचं तत्त्वज्ञान मांडणारा जादूगार साहिर लुधियानवी : संध्या देशपांडे*

 belgaum

अलौकआयोज्रतिभेचा कलावंत गीतकार साहिर लुधियानवींच्या कविता, गाणी लोकांच्या अजूनही आठवणीत आहेत. हेच त्यांच्या प्रतिभेचं यश. आज त्यांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू झालंय. साहिर चित्रपटसृष्टीत गीतकार म्हणून आले त्या काळात अनेक गीतकार इथं नशीब आजमावत होते. पण साहिर यांच्या वाट्याला लोकांचं जे प्रेम, कुतूहल, आदर मिळाला, तो इतरांच्या वाट्याला फारसा आला नाही.

सन १९५७ ला ‘प्यासा’ प्रदर्शित झाला. तेव्हा गुरुदत्त, वहिदा रहमान, माला सिन्हा या कलाकारांच्या फोटोंनी सजलेल्या सिनेमाच्या जाहिराती केल्या होत्या. त्याची गाणी इतकी प्रभावी ठरली की, पुढं सिनेमाच्या जाहिरातीवर कलाकारांचे फोटो न झळकता सिनेमातली ‘जिन्हे नाज है हिंद पर वो कहाँ है’ आणि ‘ये दुनिया अगर मिल भी जाये तो क्या है’, ही गाणी A Lyrical new high in film music, Sheer ecstasy you have never before experienced अशा मजकुरासोबत लोकांचं लक्ष वेधलं.

हिंदी सिनेसृष्टीत हे पहिल्यांदाच घडत होतं आणि पुन्हा असं कधी घडलं नाही. एखाद्या गीतकारासाठी हा सर्वोच्च असा सन्मानच होता. या सिनेमाच्या यश, मानसन्मानात सर्वाधिक वाटा होता तो गीतकार साहिर लुधियानवी यांचा. प्रत्येक रसिक मनाला या नावाची भुरळ पडल्याशिवाय राहत नाही. ८ मार्च १९२१ ला त्यांचा जन्म झाला. हे त्यांचं जन्मशताब्दी वर्ष.

साहिर चित्रपटसृष्टीत गीतकार म्हणून आले त्या काळात अनेक गीतकार इथं नशीब आजमावत होते. पण साहिर यांच्या वाट्याला लोकांचं जे प्रेम, कुतूहल, आदर मिळाला, तो इतरांच्या वाट्याला फारसा आला नाही. त्यांचा मृत्यू २५ ऑक्टोबर १९८० चा. त्यांना जाऊन ४० वर्षांपेक्षा जास्त काळ लोटलाय. पण त्यांच्या कविता, गाणी लोकांच्या अजूनही आठवणीत आहेत. हेच त्यांच्या प्रतिभेचं यश म्हणावं लागेल.

: वो सुबह कभी तो आयेगी!

 

कविता, कार्ल मार्क्सचं वेड
साहिर यांचं मूळ नाव अब्दुल हयी. लुधियानातल्या चौधरी फजल मोहम्मद या श्रीमंत जमीनदाराचा हा एकुलता मुलगा. चौधरी फजलच्या अकराव्या बायकोच्या पोटी अब्दुल जन्माला आला. आईचं नाव सरदार बेगम. नवर्‍याच्या वागण्यातला एकही गुण मुलामधे येऊ नये यासाठी ती प्रयत्नशील असायची.

चौधरी फजलच्या वागण्याला कंटाळून वारेमाप संपत्ती लाथाडून सरदार बेगम अब्दुलला घेऊन माहेरी आली. पुढे शाळेचं शिक्षण पूर्ण करून अब्दुल लुधियानाच्या गवर्मेंट कॉलेजमधे दाखल झाला. त्या काळात ब्रिटिश राजवटीविरोधात वातावरण तापलं होतं. पण अब्दुलला मात्र कविता आणि कार्ल मार्क्स यांच्या विचारांचं वेड लागलं होतं.

मोहम्मद इकबाल, फैज अहमद फैज, जोश मलिहाबादी, मजाज लखनवी या कवींचा त्यांच्यावर खूप प्रभाव पडला. तो प्रभाव त्यांच्या ‘तखल्लुस’ म्हणजे टोपण नावातही जाणवतो. तखल्लुस त्याने इकबाल यांनी दाग या कवीच्या आठवणीत लिहिलेल्या कवितेतून घेतलं.

प्रेमात पडले आणि कॉलेजमधून बाहेरही
इस चमन में होंगे पैदा बुलबुले शीराज भी,
सैंकडो साहिर भी होंगे, साहिबें एजाज भी।

या कवितेतला साहिर हा शब्द त्यांनी स्वतःच्या तखल्लुससाठी निवडला. साहिर अर्थात जादूगार. या शब्दाबरोबर लुधियाना हे जन्माचं गाव जोडलं आणि साहिर लुधियानवी हे नवं नाव अब्दुलला मिळालं. खरं तर अत्यंत असुरक्षित नैराश्यानं भरलेलं त्यांचं बालपण होतं. या काळापासून दूर होण्याची, जुनी ओळख पुसण्याची संधीच त्यांना या नावाने मिळाली. आपलं बालपण, भूतकाळ याविषयी त्यांनी कवितेत वर्णन केलंय की,

मेरे माजी को अंधेरे में दबा रहने दो,
मेरा माजी मेरी जिल्लत के सिवा कुछ भी नही।

तेव्हाच्या उर्दू कवीमधे टोपण नावानं लिहिण्याचा ट्रेंड होता. पण साहिर यांचं बदललेलं नाव दुःखी भूतकाळातून बाहेर पडण्याची धडपड वाटते. कॉलेजच्या काळात त्यांच्या कविता आणि नेतृत्वगुणांनाही धार चढायला लागली. ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या कामात त्यांनी स्वतःला झोकून दिलं होतं. ते कॉलेजमधे लोकप्रिय होते. पण त्यांच्या कविता आणि भाषणं कॉलेजच्या मॅनेजमेंटला पटत नव्हतं.

याच काळात ते महिंदर नावाच्या वर्गमैत्रिणीच्या प्रेमात पडले. पण टीबीनं तिचा मृत्यू झाला. पुढं त्याच कॉलेजमधली इशर कौर नावाची आणखी एक मुलगी त्यांच्या आयुष्यात आली. सुट्टीच्या काळात प्राचार्यांच्या बंगल्यात इशरला भेटण्याचा ठपका साहिर यांच्यावर ठेवून इशर आणि साहिर दोघांनाही कॉलेजमधून काढून टाकलं.

: कैफी आझमींचं कवितेतलं स्वप्न साकारणारी शबाना

 

२३ व्या वर्षी कवितासंग्रह
खरं तर साहिर यांचे कम्युनिस्ट विचार, त्यांनी कवितेतून व्यवस्थेवर ओढलेले कोरडे, त्यांची भाषणं हीच खरी कॉलेजची अडचण होती. पण पुढं चित्रपटसृष्टीत यशस्वी झाल्यावर याच कॉलेजनं एका ऑडिटोरियमला साहिर ऑडिटोरियम असं नाव देत सन्मानही केला. कॉलेज जीवनातल्या प्रेमभंगाचं दुःख, दुरावा यामुळं कवितेतही हीच निराशा यायला लागली.

लहानपणापासून अनुभवलेली श्रीमंतांची, जमीनदारांची मग्रुरी, अत्याचार त्यात भरडली जाणारी गरीब, लाचार माणसं हे सगळं बघून प्रेमभंगाच्या दुःखाचा, प्रेमाच्या हळूवार भावनांचा विसर पडून कवितेत समाजाचा, श्रीमंत-गरीब दरीचा, असंतोषाचा आणि अन्यायाचा उल्लेख वारंवार यायला लागला.

१९४४ ला २३ व्या वर्षी साहिर यांचा ‘तलखियाँ’ हा कवितासंग्रह प्रकाशित झाला. त्यातल्या कवितांतून साहिर यांनी तारुण्यसुलभ प्रेमाचा बुरखा उतरवला आणि त्यांच्या कवितेनं क्रांतिकारी लेणं पांघरलं.

अगदी रोखठोक शैलीत सामान्यजनांच्या व्यथा मांडल्या. प्रेमाच्या हळव्या, चंचल, उत्तेजित अवस्था दूर सारत रोजच्या जगण्यातले संघर्ष, कटू अनुभव याकडं समाजाचं लक्ष वेधलं आणि अल्पावधीतच त्यांची ओळख जनमानसात रुजली.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.