उत्तर प्रदेशची बेळगावात पुनरावृत्ती करण्याचा हा डाव आहे. उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बुलडोझर चालून भूमाफियांना जमीनदोस्त केले आहे. त्यांनी तिकडे भूमाफियांना संपविले तर इकडे बेळगावात शेतजमिनी हडप करण्याद्वारे भूमाफियांचा शिरकावा होण्याची शक्यता आहे, असे परखड मत मराठा समाजाचे नेते किरण जाधव यांनी व्यक्त केले.
बेळगावात रिंग रोडसाठी संपादित केली जाणारी सुपीक जमीन वाचवण्यासाठी फ्लाय ओव्हर हे पर्याय आहेत का यावर बेळगाव live ने त्यांचे लक्ष वेधले असता त्यांनी वरील विधान केले आहे.
खरेतर सुपीक जमिनी गिळंकृत करून भूमाफियाना प्रोत्साहन देण्याचे काम सध्या केले जात आहे ते थांबवण्याची गरज बांधकाम व्यवसायिक असलेल्या किरण जाधव यांनी व्यक्त करत सुपीक शेतजमिनींवर निवासी संकुल उभारण्याऐवजी बहुमजली इमारत उभारणीस परवानगी दिल्यास घरांची समस्या निकालात निघू शकते असे सांगितले. वाढत्या लोकसंख्येची गरज आणि स्मार्ट सिटी योजना यामुळे बेळगावचा चारही बाजूला विकास होत आहे. तो विकास बहुमजली इमारतींच्या स्वरूपात ऊर्ध्वदिशेने देखील घडला पाहिजे असे मत मांडले.
बेळगाव शहर परिसरात अनेक मोठ्या सरकारी जागा आहेत. या जागांवर बहुमजली इमारती उभारण्यात आल्यास या इमारतींच्या तळमजल्यावर सरकारी कार्यालय आणि वरील बाजूस असलेल्या मजल्यांवर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी घरांची सोय करून देता येऊ शकते. आज हुबळी -धारवाड शहरं निवासी आणि व्यापारी संकुल उभारणीच्या बाबतीत बरेच प्रगत झाली आहेत. मात्र दुर्देवाने प्रशासनाकडे निर्णय घेण्याची क्षमता नसल्यामुळे बेळगावमध्ये मात्र तसे घडत नाही आहे, असेही जाधव यांनी खेदाने सांगितले.
बेळगावचा रिंग रोड आणि त्यासाठी संपादित केली जाणारी शेत जमीन या संदर्भात बोलताना ते म्हणाले की, बेळगावच्या चौफेर काळी आणि लाल मातीची जमीन आहे. यापैकी लाल मातीची बहुतांश जमीन लष्कराच्या ताब्यात आहे, तर उर्वरित काळ्या मातीच्या सुपीक जमिनीचा वापर शेतीसाठी केला जातो. त्यामुळे रिंग रोड प्रकल्पासाठी गरीब सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचा वापर केला जाणार आहे. बेळगावातील रहदारीची समस्या निकालात काढण्यासाठी खरेतर रिंगरोड हा एकमेव पर्याय नाही. त्याऐवजी फ्लाय ओव्हर ब्रिज देखील उभारता येऊ शकतो.