शहापूर शिवाजी उद्याना शेजारील नव्या रवींद्र कौशिकी ई -लायब्ररीच्या इमारतीमध्ये शहरातील पहिलावहिला किड्स झोन होणार असून त्यासाठी बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेडने निविदा काढली आहे.
रवींद्र कौशिक ई -लायब्ररी इमारतीच्या छतावरील जागा किड्स झोन उपक्रमासाठी राखीव ठेवण्यात आली आहे. शहरातील 3 ते 10 वर्षे वयोगटातील मुलांसाठी हा किड्स झोन तयार केला जाणार आहे.
या किड्स झोनमध्ये सॉफ्टवेअर व हार्डवेअर कंपार्टमेंट बसविण्यासाठी निविदा मागविल्या आहेत. हे काम मिळणाऱ्या कंपनीला पुढील 3 वर्षे किड्स झोनची देखभाल ही करावी लागणार आहे. तसेच उपकरणांची 3 वर्षाची हमी द्यावी लागणार आहे. या योजनेसाठी 1 कोटी 98 लाख रुपये यांचा निधी खर्च केला जाणार आहे.
मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रशिक्षक किंवा कर्मचाऱ्याची नियुक्ती देखील ठेकेदाराला करावी लागणार आहे. दोन महिन्यापूर्वी काढलेल्या निविदा प्रक्रियेला प्रतिसाद न मिळाल्यामुळे स्मार्ट सिटी लिमिटेडने विविध संस्थांकडून किड्स झोन बाबतची माहिती घेऊन निविदा काढली आहे. निविदा दाखल करण्याची अंतिम तारीख 16 मार्च असून 25 मार्च रोजी प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.
त्यामुळे या महिन्यातच ठेकेदार निश्चित होणार आहे. शहरातील कांही मॉल्समध्ये लहान मुलांसाठी स्वतंत्र झोन आहेत. तथापि तेथे खेळणे व बागडणे एवढेच पर्याय उपलब्ध आहेत. याउलट स्मार्ट सिटीतील या किड्स झोनमध्ये मुलांच्या बुद्धिमत्ता विकासासाठी मार्गदर्शन केले जाणार आहे हे विशेष होय. त्यासाठी आवश्यक संगणक उपकरणे तेथे बसविली जाणार आहेत.
किड्स झोन निर्मिती हा स्मार्ट सिटी विभागाचा अभिनव उपक्रम आहे. या योजनेची अंमलबजावणी करण्याआधी किड्स झोनची पुरेपूर माहिती घेण्यात आली आहे. रवींद्र कौशिक डिजिटल लायब्ररी तयार होईल, अशी माहिती स्मार्ट सिटीचे सहाय्यक कार्यकारी अभियंता अजित पाटील यांनी दिली आहे.