Friday, December 20, 2024

/

‘वडिलांच्या प्रेरणेमुळेच बॉडी बिल्डींग मध्ये यश’

 belgaum

केतकी पाटील -डोंगरे या महिला शरीर सौष्ठवपटूने बेळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवताना पांडेचेरी येथे नुकत्याच झालेल्या 12 व्या कनिष्ठ मिस्टर इंडिया -2022 शरीर सौष्ठव स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले. या पद्धतीने केतकी यांनी तिसऱ्यांदा राष्ट्रीय पातळीवरील शरीर सौष्ठव स्पर्धेत पदक हस्तगत केले आहे.

बेळगावच्या 32 वर्षीय केतकी पाटील यांनी आपल्या वडिलांपासून शरीर सौष्ठवाची प्रेरणा घेतली. त्यांचे वडील मनोहर पाटील हे बेळगावातील एकेकाळचे मातब्बर शरीरसौष्ठवपटू होते. त्यांनी आपल्या उमेदीच्या काळात बेळगाव श्री आणि कर्नाटक श्री हे मानाचे किताब हस्तगत केले होते. केतकी यांना शरीर सौष्ठवाकडे वळण्यासाठी मनोहर पाटील यांनीच प्रेरित केले. त्यामुळे केतकी आपल्या वडिलांना आपला पहिला गुरु मानतात. यासंदर्भात बोलताना केतकी पाटील यांनी माझ्या वडिलांनी मला प्रोत्साहित करून प्रारंभी थोडेफार मार्गदर्शन केले. त्यानंतर नामवंत शरीरसौष्ठवपटू शेखर लाड, कनिष्ठ मिस्टर वर्ल्ड बेंजामिन जेरार्ड आणि मिस्टर वर्ल्ड चेन्नईचे राजेंद्र मनी यांनी मला विशेष मार्गदर्शन करून प्रशिक्षण दिल्याचे सांगितले.

केतकी यांचा विवाह 2019 साली नोव्हेंबर महिन्यात जगजीत मदन डोंगरे यांच्याशी झाला. शरीरसौष्ठव क्षेत्रात आपल्या पत्नीने जे यश मिळवले आहे त्याचा डोंगरे यांना सार्थ अभिमान आहे. तिने या क्षेत्रात यापेक्षाही मोठी यशाची शिखरे पादाक्रांत करावी अशी त्यांची इच्छा असून ते केतकी यांना मदत करण्यासाठी कायम सज्ज राहून सतत प्रोत्साहित करत असतात. शरीर सौष्ठव क्षेत्रातील आपले उद्दिष्ट गाठण्यासाठी केतकी खाजगी जिम्नॅशियममध्ये दिवसातील 4 तास व्यायामाद्वारे कठोर मेहनत घेत असते. त्याचप्रमाणे आहाराचे पथ्यही ती काटेकोरपणे पाळत असते, असे डोंगरे यांनी सांगितले.Ketaki patil

केतकी पाटील यांनी गेल्या 2018 सालापासून शरीर सौष्ठव स्पर्धांमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली. त्यांनी 2019 मध्ये राष्ट्रीय पातळीवरील शरीर सौष्ठव अजिंक्यपद स्पर्धा आणि आशियाई क्लब आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठव अजिंक्यपद स्पर्धेत भाग घेतला होता. अमलापुरम येथे 2020 साली झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील शरीरसौष्ठव स्पर्धेत त्यांनी सुवर्णपदक पटकावले. त्यानंतर लगोलग 2021 साली लुधियाना येथील राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत त्यांनी कांस्य पदक मिळविले.

यावर्षी पांडेचेरी येथे झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील शरीर सौष्ठव अजिंक्यपद स्पर्धेत त्यांनी रौप्य पदक मिळविले. केतकी पाटील यांनी शरीरसौष्ठवमध्ये यापूर्वी अनेक पुरस्कार आणि किताब हस्तगत केले आहेत. भारतीय शरीर सौष्ठव महासंघाचे (आयबीबीएफ) दक्षिण विभाग सचिव अजित सिद्दण्णावर यांनी राष्ट्रीय स्पर्धेतील यशाबद्दल केतकी यांचे खास अभिनंदन केले असून शरीर सौष्ठव क्षेत्रातील पुढील वाटचालीसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. केतकी पाटील डोंगरे यादेखील आयबीबीएफच्या सदस्य आहेत. भविष्यात जागतिक पातळीवरील शरीरसौष्ठव अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक पटविण्याचे आपले ध्येय असल्याचे केतकी पाटील -डोंगरे यांनी स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.