कावळेवाडी (ता. जि. बेळगाव) गावातील राष्ट्रपिता महात्मा गांधी वाचनालयचे अध्यक्ष वाय.पी.नाईक यांना नुकताच सावंतवाडी येथे कोकण महाचॅनेल सिंधुदुर्ग लाईव्हच्या आठव्या वर्धापन दिन कार्यक्रमात ‘गुरुगौरव पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
वाय. पी. नाईक हे सावंतवाडी येथील ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळचे संस्थापक अध्यक्ष असून शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात कार्यरत आहेत. अभ्यासपूर्ण व त्यागमय कार्याचा त्यांनी आदर्शवत ठसा उमटवला आहे. सेवानिवृत्तीनंतरही त्यांनी चालवलेले कार्य समाजाला दिशा दर्शक दीपस्तंभ सारखे ठरत आहे. बेळगाव सीमा भागातही त्यांचं कार्य खूपच उल्लेखनीय आहे
या कार्याची दखल घेऊन कोकणचे पहिलं वृत्तपत्र दैनिक कोकणसाद व सिंधुदुर्ग लाईव्हच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त औचित्य साधून सावंतवाडी जिमखाना मैदानावर झालेल्या सोहळ्यात सावंतवाडी संस्थानचे युवराज लखम राजे भोसले यांच्या हस्ते वाय. पी. नाईक यांना सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार दीपकभाई केसरकर, आमदार वैभव नाईक, आमदार नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे, जिल्हाधिकारी के.मंजूलक्ष्मी, अच्युत गोडबोले, सुब्रमण्यम केळकर, संदेश पारकर, दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी आदींसह सौ.अर्चना घारेपरब, राजाराम परब, शेखर अहिरे तसेच विद्यार्थी वर्ग, शिक्षक वर्ग, उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सोहळ्यात स्मार्ट लिडर व गुरु गौरव पुरस्काराने कोकण पुत्रांचा सन्मान करण्यात आला. यावेळी सारेगमप लिटिल चॅम्पस विजेती गौरी गोसावी हिचा सुमधुर गीतांचा कार्यक्रम संपन्न झाला. दोनसत्रात विधायक उपक्रम झाले. प्रास्ताविक संपादक सागर चव्हाण यांनी तर सूत्रसंचालन जुईली पांगम व देवयानी वरसकर यांनी केले. शेवटी रुपेश पाटील यांनी आभार मानले.