चव्हाट गल्ली येथील कर्तव्य महिला मंडळातर्फे जागतिक महिला दिन गुणवंत विद्यार्थिनी आणि कर्तुत्ववान महिलांचा सत्कार करण्याद्वारे नुकताच उत्साहात साजरा करण्यात आला.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कर्तव्य महिला मंडळातर्फे चव्हाट गल्ली येथील मारुती मंदिरामध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून एंजल फाउंडेशनच्या संचालिका मीना बेनके आणि आणि हिंदू जनजागृती समितीच्या उज्वला गावडे उपस्थित होत्या.
प्रारंभी स्वागत आणि प्रास्ताविक झाल्यानंतर व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना उज्वला गावडे यांनी आपल्या देशात महिलांना देवीचे स्थान दिले जाते. परंतु आजतागायत महिलांवरील अत्याचार मात्र कमी झालेले नाहीत. होत असलेले अत्याचार रोखण्यासाठी सर्व महिलांनी संघटित होऊन लढा उभारण्याची गरज आहे, असे सांगितले.
महिला दिनाचे औचित्य साधून या वेळी कर्तव्य महिला मंडळाच्यावतीने मीना बेनके आणि उज्वला गावडे यांच्या हस्ते दहावीच्या परीक्षेत गुणवत्तेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनींचा तसेच उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विविध महिला मंडळांच्या पदाधिकारी तसेच सर्वसामान्य महिलांचा शाल, स्मृतिचिन्ह व रोपटे देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी कर्तव्य महिला मंडळाच्या आक्काताई सुतार, रेणुका पवार, मथुरा कुट्रे, सुनिता काकतीकर, मिलन पवार, रुक्मिणी रेडेकर, शांता किल्लेकर आदींसह कर्तव्य महिला मंडळाच्या पदाधिकारी, सदस्य आणि चव्हाट गल्ली परिसरातील महिलावर्ग बहुसंख्येने उपस्थित होता.