Sunday, November 24, 2024

/

काकती येथे फ्लाय ओव्हर ब्रिज, सर्व्हीस रोडची मागणी

 belgaum

काकती येथे फ्लाय ओव्हर ब्रिज बांधण्याबरोबरच गावापासून नैऋत्य दिशेला राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 ला जोडणारा सर्व्हीस रोड युद्ध पातळीवर तयार करण्यात यावा, अशी मागणी काकती ग्रामपंचायत, श्री सिद्धेश्वर देवस्थान मंडळ आणि समस्त ग्रामस्थांतर्फे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग खात्याचे मंत्री नितीन गडकरी करण्यात आली आहे.

काकती ग्रामपंचायत, श्री सिद्धेश्वर देवस्थान मंडळ आणि समस्त ग्रामस्थांतर्फे उपरोक्त मागणीचे निवेदन गेल्या सोमवारी केंद्रीय मंत्री गडकरी यांना सादर करण्यात आल्यानंतर त्या निवेदनाची प्रत आज बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आली. देशात गोल्डन क्वाड्रीलेट्रल रोड तयार करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने 2013 साली देशभरातील कांही जमिनींचे भूसंपादन केले.

त्यावेळी काकती गावातील महामार्गा शेजारील जमिनीचेही भूसंपादन झाले. मात्र त्यामुळे काकतीवासियांची मोठी गैरसोय होत असल्याने जनतेच्या सोयीसाठी महामार्गावर अतिरिक्त आणखी थोडी जमीन भूसंपादित करून सर्व्हीस रोड बांधून देण्याची मागणी यापूर्वी करण्यात आली होती. कारण विशेष करून पावसाळ्यात सध्याच्या रस्त्यावरून ये-जा करणे कठीण जाते. या रस्त्यावर अर्धवट पडलेल्या इमारतींचा अडथळा आहे. महामार्ग प्राधिकरणाने या रस्त्याशेजारी योग्य गटारी अथवा ड्रेनेजची सोय केली नसल्यामुळे पावसाळ्यात पाण्याचा निचरा होत नाही.

परिणामी राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा असलेल्या घरांमध्ये पाणी शिरते. त्याचप्रमाणे महामार्गाशेजारील रस्त्यांवर पाण्याची तळी असतात. काकती येथे भूसंपादन झाल्यामुळे शहर बसस्थानकाशी असलेला संपर्क तुटला आहे. रहदारी वाढल्यामुळे अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. तथापि अद्यापपर्यंत काकती येथील सर्व्हीस रोडचे काम हाती घेण्यात आलेले नाही. त्याचप्रमाणे राष्ट्रीय महामार्ग शेजारील लोकांना आपले व्यवसाय चालविणे कठीण झाले असल्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सर्व्हीस रोडचे काम तात्काळ हाती घेण्याबरोबरच काकती पोलीस ठाण्यापासून गावाच्या अखेरपर्यंत सुमारे 500 मीटर अंतराचा फ्लाय ओव्हर ब्रिज देखील उभारावा, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे.

Kakti villagers

निवेदन सादर केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना काकतीचे लक्ष्मण पाटील म्हणाले की, नव्या राष्ट्रीय महामार्गामुळे मोठ्या समस्या निर्माण होतील याची आम्हाला कल्पना नव्हती. या मार्गामुळे गावाची विभागणी झाली असून वरचा आणि खालचा असे दोन भाग पडले आहेत. छोटा 12 फुटाचा ब्रिज हाच काय तो या दोन्ही भागांना जोडणारा दुवा आहे. खालच्या बाजूला ग्रामपंचायत कार्यालय, महसूल कार्यालय, कृषी खात्याचे कार्यालय, जनावरांचा दवाखाना, सरकारी शाळा अशा सर्व प्रमुख सुविधा आहेत. याखेरीज खालच्या भागातील शेतकऱ्यांच्या जमिनी वरच्या भागात आहेत तर वरच्या भागातील शेतकऱ्यांच्या जमिनी खालच्या भागात आहेत.

मात्र चीनच्या भिंती प्रमाणे गावाच्या मधून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गामुळे दोन्ही बाजूच्या लोकांना ये जा करणे मोठे त्रासाचे जात आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पोलीस स्टेशन बाजूला खालचा जो रस्ता आहे तेथे फार मोठ्या प्रमाणात अपघात होत असतात. यासाठी युद्धपातळीवर सर्व्हीस रोड आणि फ्लाय ओव्हर ब्रीजची उभारणी केली जावी अशी आमची मागणी आहे, असे पाटील यांनी सांगितले. याप्रसंगी काकतीवासीय बहुसंख्येने उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.