जे देश शिक्षणावरती सढळ खर्च करतात त्या देशांची प्रगती होते. मात्र भारतात शिक्षणावर फक्त 1.7 टक्का खर्च होतो हे दुर्दैव आहे. अशावेळी शिक्षणावरील खर्च वाढवून भाषा टिकवण्यासाठी सरकारसह सर्वांकडूनच प्रयत्न होणे आवश्यक आहे, असे मत जी. एस. एस. कॉलेज बेळगावचे माजी प्राचार्य प्रा. आनंद मेणसे यांनी व्यक्त केले.
पॉलीफ्लो पाॅलिहैड्राॅन पुरस्कृत कडोली येथील स्वामी विवेकानंद नगरीतील सरकारी मराठी प्राथमिक शाळेच्या प्रांगणात मराठी साहित्य संघ कडोली, सर्व संघसंस्था, सांगाती साहित्य अकादमी बेळगाव आणि अक्षरयात्रा दैनिक तरुण भारत बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने 37 वे कडोली मराठी साहित्य संमेलन आज रविवारी पार पडले. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून प्रा. आनंद मेणसे बोलत होते. व्यासपीठावर निमंत्रित मान्यवरांसह मराठी साहित्य संघ कडोलीचे पदाधिकारी उपस्थित होते. स्वातंत्र्य चळवळीमध्ये साहित्यिकांची भूमिका महत्त्वाची होती असे सांगून त्यांनी या चळवळीत ज्या साहित्यिकांचा सहभाग होता त्यांच्याबद्दल माहिती दिली. तसेच भाषा समृद्ध होण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत भारतात केवळ 1.7 टक्के खर्च शिक्षणावर असल्याने शाळांची अवस्था दयनीय झाली आहे. ही परिस्थिती बदलण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे असे ते म्हणाले.
सार्वजनिक वाचनालयाने दगाबाजी करून आमचे सदस्यत्व रद्द केले हे योग्य नाही. परंतु कडोली संमेलनाने आम्हाला आमंत्रित करून त्यांना एक उत्तर दिले आहे असे आम्ही समजतो आणि या पद्धतीने केवळ मलाच नव्हे तर माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांना काम करण्याची जिद्द या संमेलनालाने दिली आहे असे सांगतानाच रशिया -युक्रेन युद्धाला सुरुवात होऊन 19 दिवस झाले. परंतु कोणतेही युद्ध होऊ नये असेच आपल्या सर्वांची भूमिका असायला हवी असा ठराव त्यांनी मांडला. तसेच भारतातील विद्यार्थी युक्रेनमध्ये वैद्यकीय शाखेचे शिक्षण घेण्यास गेले होते याचा अर्थ भारतामध्ये शिक्षण महाग आहे. तेंव्हा भारतातील शिक्षण कमी खर्चामध्ये उपलब्ध व्हावे असा दुसरा ठरावही आपण मांडत असल्याचे प्रा. आनंद मेणसे यांनी स्पष्ट केले.
दुपारच्या दुसऱ्या सत्रात सरस्वती वाचनालय शहापूरच्या अध्यक्षा प्रा. स्वरूपा इनामदार यांनी ‘आजची महिला -नवा दृष्टिकोन’ या विषयावर आपले मत व्यक्त केले. आज सर्वच क्षेत्रात महिला पुढे येत असून त्या सर्वार्थाने सक्षम झाल्या आहेत असे प्रा. इनामदार म्हणाल्या. संमेलनाच्या अखेरचा तिसऱ्या सत्रात शब्दगंध कवी मंडळाचे कवी संमेलन पार पडले.
प्रारंभी आज सकाळी प्रमुख पाहुणे ह भ प बाळकृष्ण निंगाप्पा चौगुले यांच्या हस्ते पालखी व ग्रंथ पूजन झाले. केदनूरचे माजी ग्रा. पं. अध्यक्ष राजू बाबागौडा पाटील यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले. त्यानंतर स्वामी विवेकानंद संमेलन नगरीचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते जीवन माधवराव भोसले यांच्या हस्ते झाले.
संमेलनाच्या व्यासपीठाचे उद्घाटन सांगाती साहित्य अकादमीचे सदस्य बसवंत शहापूरकर यांनी केले. त्यानंतर शिवप्रतिमेसह सावित्रीबाई फुले, श्री सरस्वती, संत ज्ञानेश्वर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमांचे पूजन अनुक्रमे शिवाजी मरगाळे, रुक्मिणी निलजकर, सुजाता मायणाचे आणि सामाजिक कार्यकर्त्या संगीता पाटील यांच्या हस्ते झाले. सदर संमेलनास कडोली पंचक्रोशीसह बेळगाव शहर परिसरातील साहित्यप्रेमी बहुसंख्येने उपस्थित होते.