कोलंबो येथे नुकत्याच झालेल्या निमंत्रितांच्या श्रीलंका मास्टर्स शॉर्ट कोर्स जलतरण अजिंक्यपद स्पर्धेत बेळगावच्या नामवंत महिला जलतरणपटू आणि कडोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचारी ज्योती कोरी यांनी 4 सुवर्ण व 2 कांस्य पदकं हस्तगत करून घवघवीत यश संपादन केले.
कोलंबो, श्रीलंका येथील थ्रस्टन कॉलेज जलतरण तलावामध्ये गेल्या 5 मार्च रोजी निमंत्रितांची श्रीलंका मास्टर्स शॉर्ट कोर्स जलतरण अजिंक्यपद स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली.
या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ज्योती कोरी यांनी 40 ते 45 वयोगटांमध्ये 200 मीटर फ्रीस्टाइल तसेच 25, 50 व 200 मीटर बॅकस्ट्रोक प्रकारात प्रथम क्रमांकासह सुवर्ण पदक, तसेच 50×200 मीटर फ्रीस्टाइल रिले आणि 50×200 मीटर मिक्स रिले शर्यत कांस्य पदक पटकाविले.
आपल्या या यशाबद्दल आनंद व्यक्त करताना ज्योती कोरी यांनी आंतरराष्ट्रीय मास्टर्स स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे आपले स्वप्न अखेर साकार झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.
ज्योती कोरी यांनी यापूर्वी राज्य व राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत अनेक बक्षिसे मिळविली आहेत. त्यांना जलतरण प्रशिक्षण गोवर्धन काकतकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे. उपरोक्त यशाबद्दल ज्योती यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.