काँग्रेसमधील बदलासाठी आणि पक्ष अधिक संघटित होण्याच्या दृष्टिकोनातून या पंच अर्थात पाच राज्यांच्या निवडणुका म्हणजे आमच्यासाठी एक प्रकारचा धडा होता, असे मत केपीसीसी कार्याध्यक्ष आमदार सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केले.
शहरातील काँग्रेस भवन येथे आज सकाळी ते पत्रकारांशी बोलत होते. भाजपवाले कर्नाटक काँग्रेस मुक्त झाल्याचा प्रचार करत आहेत. ते हे स्वप्न पाहत असून जे कधीच पूर्ण होणार नाही. कर्नाटक कांग्रेस मुक्त करणे अथवा काँग्रेसला संपविणे त्यांना कधीच शक्य होणार नाही. गोव्यामध्ये मत विभाजन झाल्यामुळे त्याचा फटका आम्हाला बसला अन्यथा आमचा विजय निश्चित होता, असेही जारकीहोळी म्हणाले.
गोवा आणि उत्तर प्रदेशमध्ये मतांचे विभाजन झाल्यामुळे आम्हाला पराभव पत्करावा लागला. गोव्यामध्ये आमची हॉट बँक शेकडा 32 टक्के इतकी आहे. त्यापैकी फक्त 2 टक्के मतं कमी झाली आहेत. पुढील काळात आमचा पक्ष अधिक संघटित करून राज्यात अधिकारावर येण्यासाठी आम्ही परिश्रम घेऊ असे जारकीहोळी यांनी सांगितले.
आमच्या राज्यात आम्ही पक्ष संघटनेच्या जोरावर निवडणूका लढवतो, नेतृत्वाच्या इशाऱ्यावरून नाही. इतर राज्यातील निवडणुकीच्या निकालावरून आमच्या राज्यातील निकालाचे निष्कर्ष काढले जाऊ नयेत. आमच्याकडील निवडणुका डिफरंट असतात असेही आमदार सतीश जारकीहोळी यांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेस काँग्रेसचे माजी मंत्री सुदर्शन नाबीअप्पांना, विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, मोतीलाल देवांग, माजी एमएलसी आर. व्ही. व्यंकटेश, प्रभुनाथ द्यामन्नावर, सुरेश हेगडे अशोक कुमार आदी काँग्रेस नेते मंडळी उपस्थित होती.