बेळगाव शहरातील सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फाउंडेशनच्या हेल्प फाॅर नीडी प्रकल्पांतर्गत फेसबुक फ्रेंड्स सर्कलच्या सहकार्याने आज एका निराधार वयोवृद्ध महिलेला सरकारी निवारा केंद्रात आश्रय मिळवून देण्यात आला.
याबाबतची थोडक्यात माहिती अशी की, फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे प्रमुख संतोष दरेकर आणि अवधूत तुडवेकर यांनी फोनवरून हेल्प फाॅर नीडीचे प्रमुख सुरेन्द्र अनगोळकर यांना शहरातील वीरभद्रनगरला जोडणाऱ्या शिवाजीनगर मेन रोडच्या ठिकाणी पोलिस कॉर्टरनजीक एक निराधार वयोवृद्ध महिला असहाय्य अवस्थेत उभी असल्याचे सांगितले. त्यानंतर याबाबतची माहिती पोलीस उपायुक्त रवींद्र गडादी यानाही देण्यात आली. त्यांनी लगेच एक महिला पोलीस अधिकाऱ्यांला मार्केट पोलिसांसमवेत घटनास्थळी धाडले.
संबंधित वयोवृद्ध महिला गेल्या तीन वर्षापासून या ठिकाणी रस्त्याशेजारी उघड्यावर वास्तव्य करून होती. पावसाळ्यात ती बंद दुकानासमोरील छताखाली आसरा घेत होती, अशी माहिती स्थानिक रहिवाशांनी सुरेंद्र अनगोळकर यांना दिली.
त्यानंतर संबंधित वयोवृद्ध महिलेला हेल्प फाॅर नीडीच्या रुग्णवाहिकेतून श्रीनगर भागातील निराधारांसाठी असलेल्या सरकारी निवारा केंद्रात नेऊन दाखल करण्यात आले. या कार्याबद्दल शिवाजीनगर परिसरातील नागरिक आहात मार्केट पोलिसांसह हेल्प फाॅर नीडी आणि फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे कौतुक होत आहे.