बेंगलोर येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा विटंबना आणि समिती अध्यक्षांवरील शाई फेकीच्या निषेधासह महाराष्ट्राच्या सीमावर्तीय भागातील मराठी जनतेवर दडपशाही करणाऱ्या कर्नाटक शासनाची निंदा करणाऱ्या अभिभाषणाचे वाचन महाराष्ट्राच्या राज्यपालांनी जाणीवपूर्वक टाळले असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी आज केला.
तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून हे घडले असून राज्यपालांना स्वतःच्या कृतीची लाज वाटली पाहिजे, असे परखड मत देखील मिटकरी यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र विधानसभेचे तीन दिवसाचे अधिवेशन सुरू झाले आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई येथे आज गुरुवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी म्हणाले की, अधिवेशनावेळी सभागृहात आज केलेल्या कृतीची महाराष्ट्राच्या राज्यपालांना लाज वाटली पाहिजे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोशीयारी यांनी आपल्या अभिभाषणात वेळी जी चूक केली किंवा ती चूक करायला भाजपने त्यांना भाग पाडले असा माझा आरोप आहे. राज्यपाल आज सकाळी 11 वाजता सभागृहात दाखल झाल्यानंतर नियमानुसार राष्ट्रगीत झाले.
त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय अशी घोषणा देण्यात आली. दुसरी घोषणा महात्मा फुले, शिवाजी महाराज कि जय अशी देण्यात आली. त्यावेळी शिवाजी महाराजांचा जयजयकार होत असताना राज्यपालांनी किंचित थांबायला हवे होते. मात्र तसे न करता त्यांनी आपले अभिभाषण वाचन सुरूच ठेवले. मात्र अभिभाषणाच्या तिसऱ्या मुद्द्यावेळी भाजपच्या या मंडळींनी सभागृहात गोंधळ घालण्यास सुरुवात केली.
राज्यपालांनी नेमके या गोंधळाचे निमित्त साधून तिसऱ्या मुद्द्याचे वाचन करणे टाळले. मुद्दा क्रमांक 3 असा होता की, माझ्या शासनाचा महाराष्ट्राच्या सीमावर्तीय क्षेत्रातील मराठी भाषिक जनतेच्या हक्कासाठी उभे राहण्याचा निर्धार आहे 16 डिसेंबर 2021 रोजी बेंगलोरमध्ये झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा विटंबनेचा आणि बेळगावमधील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अध्यक्षांवर शाई फेकण्याच्या कृत्याचा माझे शासन तीव्र निषेध करत आहे. विवादग्रस्त सीमावर्तीय क्षेत्रातील मराठी जनतेवर कर्नाटक शासनाने केलेली दडपशाहीची कृत्ये निंदनीय आहेत असा तो मुद्दा होता, असे मिटकरी यांनी सांगितले.
माझ्या मते हा तिसरा मुद्दा ज्यावेळी राज्यपालांनी वाचायला सुरुवात केली. त्यावेळी त्यांना वाटले की कर्नाटक सरकारवर जर का आपण कांही बोललो तर तेथे भाजपचे सरकार आहे. त्यामुळे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून भाजपचे समर्थक असलेले महाराष्ट्राचे राज्यपाल तिसऱ्या मुद्द्यामुळे अडचणीत येऊ शकत होते. म्हणूनच या मुद्द्या वेळी भाजपच्या आमदारांनी सभागृहात गोंधळ घातला. राष्ट्रगीताचाही अवमान केला.
माझा राज्यपालांना प्रश्न आहे की तुम्ही महाराष्ट्राचे राज्यपाल आहात की कर्नाटकचे? राज्यपालांच्या अभिभाषणात वेळी गदारोळ घालणाऱ्या भाजपच्या मंडळींनी एकप्रकारे राष्ट्रगीताचा देखील अवमान केला आहे. कांही दिवसापूर्वी राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला होता. त्याचप्रमाणे पुणे येथे महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचाही अवमान केला आहे.
त्यामुळे राज्यपाल पदावर राहण्याचा त्यांना कोणताही नैतिक अधिकार नाही. एकंदर छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या, भारतीय संविधानाचा अवमान करणाऱ्या राज्यपालांचा आणि त्यांना खतपाणी घालून संरक्षण व्यवस्था पुरवणाऱ्या भारतीय जनता पक्षाचा व राज्यपालांचा मी धिक्कार करतो, निषेध करतो असे राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी शेवटी परखडपणे म्हणाले.