बेळगाव शहरातील क्रीडापटूंचा सकारात्मक विकासासाठी पर्यटकांचे आकर्षण असलेला किल्ला तलाव यावेळी प्रथमच जलतरण स्पर्धेसाठी वापरला जाणार आहे. होय हा तलाव लवकरच ‘सुपर बिईंग -2022 ट्रायथलॉन आणि डुयथलाॅन’ या स्पर्धेच्या पूर्ततेसाठी वापरला जाणार आहे.
बेळगाव पेडलर्स क्लब आणि बेळगाव ॲक्वेटिक क्लब यांच्या सहकार्याने थॉटफ्लो संस्थेतर्फे येत्या रविवार दि. 27 मार्च रोजी ‘सुपर बिईंग -2022 ट्रायथलॉन आणि डुयथलाॅन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेतील जलतरणाचा प्रकार बेळगावच्या किल्ला तलावांमध्ये घेतला जाणार आहे. शहरांमध्ये आज सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये इव्हेंट कॉर्डिनेटर डाॅ. रवि खोत आणि थाॅटफ्लो एज्युकेशन ट्रस्टचे व्यवस्थापकीय संचालक गिरीश दोड्डण्णावर यांनी ही माहिती दिली. गुणवत्ता नियंत्रण एजन्सीकडून यापूर्वीच किल्ला तलावातील पाण्याची तपासणी करण्यात आली असून तलावातील पाणी पोहण्यायोग्य असल्याचा एजन्सीचा अहवाल आहे.
‘सुपर बिईंग -2022 ट्रायथलॉन आणि डुयथलाॅन हा एक असा क्रीडाप्रकार आहे. ज्यामध्ये धावणे, जलतरण आणि सायकलिंग या सहनशक्तीचा कस पाडणाऱ्या क्रीडा प्रकारांचा समावेश असतो. स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी स्पर्धकांना 1.5 कि. मी. पोहणे त्यापाठोपाठ 40 कि. मी. सायकलिंग करणे आणि शेवटी 10 कि. मी. धावण्याची शर्यत पूर्ण करावी लागते.
ट्रायथलॉन आणि डुयथलाॅन या स्पर्धांमध्ये यशस्वी होण्यासाठी क्रीडापटूमध्ये मोठी शारीरिक आणि मानसिक ताकद लागते, असे डॉ. रवी खोत यांनी सांगितले. तसेच उत्तर कर्नाटकाच्या दृष्टिकोनातून या स्पर्धांसाठी प्रथमच किल्ला तलावा सारखा खुला तलाव वापरला जाणार आहे. या स्पर्धेत बेळगाव, निपाणी, कोल्हापूर, हुबळी, गोवा आदी विविध ठिकाणच्या एकूण 152 स्पर्धकांचा सहभाग असणार आहे. स्पर्धेला 27 रोजी सकाळी 6:15 वाजता किल्ला तलावाच्या ठिकाणी प्रारंभ होईल, अशी माहिती डॉ. खोत यांनी दिली.
‘सुपर बिईंग -2022 ट्रायथलॉन आणि डुयथलाॅन’ स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांसाठी विविध गिफ्ट हॅम्पर्ससह एकूण 1.65 लाख रुपयांची रोख पारितोषिके पुरस्कृत करण्यात आली आहेत. सदर स्पर्धा 18 ते 34 वर्षे वयोगट (इलाईट कॅटेगिरी) आणि 35 वर्षे व त्यावरील वयोगट (मास्टर्स कॅटेगिरी) अशा दोन विभागात घेतली जाणार असून पुरुष आणि महिला अशा दोन्ही स्पर्धकांना पारितोषिके दिली जाणार आहेत. पत्रकार परिषदेस साई जाधव, आश्किन आजरेकर, जियाज इनामदार आणि मयुरा शिवलकर उपस्थित होते.