टिळकवाडी येथील व्हॅक्सिन डेपो येथील झाडाझुडपांना आग लागण्याचा प्रकार पुन्हा काल मंगळवारी घडला. तथापी सामाजिक कार्यकर्त्यांच्या दक्षतेमुळे वेळीच घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणली.
व्हॅक्सिन डेपो येथील झाडाझुडपांना आग लागण्याचा प्रकार पुन्हा काल मंगळवारी घडला. झाडाझुडपांना लागलेली आग विझवण्यासाठी फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे प्रमुख सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर, अवधुत तुडयेकर आणि वरूण खासणीस यांनी कसोशीने प्रयत्न केले.
आगीने रौद्ररूप धारण करू नये याकरता आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न निष्फळ ठरून आगीने जास्तच पेट घेतल्यामुळे संतोष दरेकर यांनी अखेर अग्निशामक दलाला घटनेची माहिती दिली.
आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या अधिकारी व जवानांनी व्हॅक्सिन डेपोकडे धाव घेऊन आग आटोक्यात आणली.
निसर्गरम्य वातावरण आणि शुद्ध हवेसाठी प्रसिद्ध असणाऱ्या शहराचे फुफ्फुस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्हॅक्सिन डेपो परिसरात अशाप्रकारे पुन्हा -पुन्हा आग लागण्याचे प्रकार घडत आहेत. तरी वनखात्याने याची गांभीर्याने दखल घेऊन लक्षपूर्वक नजर ठेवावी अशी मागणी पर्यावरणप्रेमींकडून होत आहे.