Saturday, October 5, 2024

/

अधिकारी -शेतकरी संघर्ष …अखेर प्रशासनाने घेतले नमते

 belgaum

जमीन बळकावणारे प्रशासन आणि आपली सुपीक जमीन वाचविणारे शेतकरी असा संघर्ष आज देखील बेळगावकरांना पहावयास मिळाला. शेतकरी कुटुंबाने जोरदार आंदोलन छेडून आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे एसटीपी प्रकल्पासाठी 1 एकर शेत जमिनीचा कब्जा घेण्यासाठी पोलीस फौजफाटा घेऊन गेलेल्या केयुडब्ल्यूएसच्या अधिकाऱ्यांना हात हलवत माघारी परतावे लागल्याची घटना आज सोमवारी सकाळी पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील हरिकाका कंपाउंड नजीक घडली.

यावेळी जोरदार संघर्ष होऊन शेतकरी कुटुंबासह शेतकरी संघटनेच्या नेत्यांनीही भूसंपादनास तीव्र विरोध दर्शविल्यामुळे अखेर प्रशासनाला नमते घ्यावे लागले. याबाबतची माहिती अशी की, महादेव रामचंद्र गोडसे आणि त्यांच्या तीन बंधूंची राष्ट्रीय महामार्ग शेजारी हरिकाका कंपाउंड नजीक 2 एकर 4 गुंठे शेतजमीन आहे. एसटीपी प्रकल्प उभारण्यासाठी सदर जमिनीपैकी 1 एकर जमिनीचा कब्जा घेण्यासाठी आज सकाळी पाणीपुरवठा मंडळाचे अर्थात केयुडब्ल्यूएसचे अधिकारी पोलीस फौजफाट्यासह शेत जमिनीच्या ठिकाणी गेले होते.

मात्र जमिनीचे मालक गोडसे कुटुंबीयांनी जोरदार आंदोलन छेडून भूसंपादनास जोरदार विरोध दर्शविला. आम्हाला कोणतीही पूर्वसूचना अथवा नोटीस न देता, शिवाय जमिनीचा वाद न्यायप्रविष्ट असताना आमच्या जमिनीचा कब्जा तुम्ही कसा घेता? असा संतप्त सवाल गोडसे कुटुंबियांनी केला. यावेळी अधिकारी आणि गोडसे कुटुंबीय यांच्यात जोरदार शाब्दिक संघर्ष झाला. तथापि मागे न हटता गोडसे कुटुंबीयांनी आपले आंदोलन सुरूच ठेवून भूसंपादनास तीव्र विरोध केला. त्यामुळे सदर कुटूंबीय आणि अधिकारी यांच्यातील सकाळी 9 वाजता सुरू झालेला संघर्ष 11.30 वाजेपर्यंत सुरू होता. अखेर अधिकाऱ्यांना गोडसे कुटुंबियांसमोर नमते घेऊन माघारी परतावे लागले.Godse

गोडसे कुटुंबीयांनी छेडलेल्या आंदोलनाप्रसंगी कर्नाटक राज्य रयत संघटनेचे अध्यक्ष चिन्नाप्पा पुजारी, शेतकरी नेते राजू मरवे प्रकाश नायक आदींसह श्रीराम सेनेचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर उपस्थिती दर्शवून त्या शेतकरी कुटुंबाला संपूर्ण पाठिंबा दर्शविला. आंदोलनकर्त्या शेतकरी कुटुंबासह शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी भूसंपादनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्याबरोबरच कर्नाटकातील भाजप सरकारच्या अधिकाराच्या घोषणा दिल्या. आंदोलनस्थळी गोडसे कुटुंबियांकडून पेट्रोलचे कॅन आणण्याचा प्रयत्न झाला. मात्र संभाव्य धोका लक्षात घेऊन पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून ते पेट्रोल कॅन जप्त केले.

आमची एकूण 2 एकर चार गुंठे शेत जमीन आहे त्यातील 1 एकर एक गुंठा जमीन आमच्या संमतीविना भूसंपादन केली जात आहे हा आमच्यावर अन्याय आहे. कोणतीही पूर्वसूचना नोटीस वगैरे न देता पोलिसांच्या मदतीने आमच्या जमिनीचा कब्जा मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे असे गोडसे बंधूंनी बेळगाव लाईव्हशी बोलताना सांगितले. केयुडब्ल्यूएसचे अधिकारी तुमच्या जमिनीचा आम्ही कब्जा घेणारच काय करायचे ते करा अशी धमकावणी सातत्याने देत आहेत. गेल्या 15 वर्षांपासून आमच्या शेत जमिनीचा वाद न्यायप्रविष्ट आहे असे असताना ही कारवाई केली जात आहे. आमची संमती नसताना बेकायदेशीररित्या उताऱ्यावर आपले नाव सोडून जमिनीचा कब्जा घेण्याचा प्रयत्न केला जात आहे, असेही गोडसे बंधूनी स्पष्ट केले.Farmers protest

शेतकरी नेते राजू मरवे यांनी यावेळी बोलताना शेत जमीन संपादनासाठी प्रथम संबंधित शेतकऱ्याची परवाने घेणे आवश्यक आहे. तथापि तसे न करता जबरदस्तीने सुपीक जमिनी बळकावण्याचा प्रयत्न केला जात आहे. गोडसे कुटुंबीयांच्या जमिनी संदर्भात न्यायालयात याचिका दाखल आहे. याबाबत कल्पना देऊनही संबंधित अधिकारी त्याचा आमच्याशी कांही संबंध नाही असे अतिशय बेजबाबदार आणि न्यायालयाचा अवमान करणारी उत्तरे देत आहेत, असे सांगितले.

शेतकऱ्याची संमती नसताना शेत जमिनी जबरदस्तीने काढून घेत असाल तर शेतकर्‍याने जगायचे कसे? त्याच्या कुटुंबाने जगायचे कसे? असा सवाल करून आमच्या शेतकरी संघटनेची एकच मागणी आहे की, या भागातील पिकाऊ जमिनीचे भूसंपादन न करता याच भागात असलेल्या पडीक जमिनीचा विकास कामांसाठी वापर करावा. विकासाला आमचा कोणताही विरोध नाही मात्र जबरदस्ती आणि दडपशाही खपवून घेतली जाणार नाही, असेही मरवे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार गोडसे कुटुंबीय, केयुडब्ल्यूएस अधिकारी आणि पोलीस यांची येत्या आठवड्याभरात जिल्हाधिकाऱ्यांसमवेत बैठक होणार आहे. सदर बैठकीनंतर शेत जमिनी बाबत तोडगा निघणार असल्याचे समजते. गोडसे कुटुंबीयांनी छेडलेल्या आंदोलनाप्रसंगी बराच पोलीस फौजफाटा त्या ठिकाणी उपस्थित होता.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.