सोनकवडे गुरुजी प्रतिष्ठान सोलापूर यांच्यातर्फे आयोजित यांना चन्नवीर भद्रेश्वरमठ आणि रोहित सोनकवडे लिखित ‘लढवय्या लोकनेता वचनरक्षक कक्कया’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला.
कक्केरी (ता. खानापूर) येथील वचनरक्षक ढोर कक्कया स्वामी समाधी स्थळाच्या ठिकाणी मंगळवारी आयोजित सदर पुस्तक प्रकाशन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे उपस्थित होते. श्री गुरुदेव आश्रम बिरवलीच्या परमपूज्य गुरुमाता नंदाताई यांच्या दिव्य सानिध्यात झालेल्या या प्रकाशन सोहळ्यास मान्यवर मंडळी उपस्थित होती. प्रारंभी उपस्थितांचे स्वागत आणि प्रास्ताविक झाल्यानंतर माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते ‘लढवय्या लोकनेता वचनरक्षक कक्कया’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. प्रकाशनानंतर माजी मंत्री शिंदे यांनी समयोचित मार्गदर्शनपर विचार व्यक्त केले.
सोलापुरातील चन्नवीर भद्रेश्वरमठ आणि रोहित सोनकवडे यांनी संशोधनातून सदर पुस्तकाची निर्मिती केली असून कक्काया यांचे जीवन चरित्र मांडले आहे. पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे औचित्य साधून खानापूर तालुक्यातील लोकांनी माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नागरी सत्कार केला.
पुस्तक प्रकाशन सोहळ्यास ग्रामपंचायत अध्यक्ष कासीम हट्टीहोळी, मल्लेशी पोळ, महादेव कोळी, रियाज पटेल, सुरेश जाधव, मारुती मावरकर, हिरोजी मावरकर ,मंजुनाथ मावरकर, गिरिजा कराटे, लक्ष्मी कदम, रवी मावरकर, पंडित कल्याणकर, अरविंद मावरकर आदींसह कक्केरी ग्रामस्थ व निमंत्रित उपस्थित होते.
बाराव्या शतकातील जेष्ठ वचनकार आणि महात्मा बसवेश्वर यांच्या नेतृत्वाखालील कल्याणकारक क्रांतीनंतर वचन रक्षणासाठी बलिदान देणारे शरण डोहर कक्कया यांचे समाधीस्थळ खानापूर तालुक्यातील कक्केरी येथे आहे.