कोरोना व अन्य कारणामुळे गेल्या 2021 -22 या आर्थिक वर्षात शहरातील मिळकतींची घरपट्टी वाढविण्यात आली नव्हती. मात्र आता कर्नाटक सरकारने जानेवारी 2021 मध्ये काढलेल्या वटहुकुमानुसार शहरातील मिळकतींची घरपट्टी 3 ते 5 टक्के वाढणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
ज्या-ज्यावेळी मुद्रांक व नोंदणी विभागाकडून मिळकतीची शासकीय मूल्य (रेडीरेकनर) वाढविली जाईल त्यावेळी घरपट्टी वाढविण्याचा अधिकार बेळगावसह राज्यातील सर्व महापालिकांना देण्यात आला आहे. ज्यावर्षी शासकीय मूल्य वाढविले जाणार नाही त्यावेळी 3 टक्के घरपट्टी वाढविण्याचा अधिकारही देण्यात आला आहे. त्यामुळे दरवर्षी सरासरी 3 टक्के घरपट्टी वाढ होण्याची शक्यता आहे. पुढील आर्थिक वर्षात घरपट्टी वाढविण्याबाबतचा प्रस्ताव बेळगाव महापालिकेकडून तयार केला जाईल.
मुद्रांक व नोंदणी खात्याने अशासकीय मूल्य वाढविलेले नाही त्यामुळे महापालिकेकडून 3 टक्के घरपट्टी वाढविली जाऊ शकते. लोकनियुक्त सभागृह अस्तित्वात आल्यास सभागृहा पुढे हा विषय मांडला जाऊ शकतो.
अन्यथा प्रशासनाकडे देखील प्रस्ताव मांडण्याची महसूल विभागाची तयारी सुरू आहे. यापूर्वी घरपट्टी आकारणी करताना मिळकतींचे 50 टक्के शासकीय मुल्य गृहीत धरले जात होते. मात्र नव्या तरतुदीनुसार मिळकतीचे 25 टक्के शासकीय मूल्य गृहीत धरले जाईल.
एकंदर कांही झाले तरी यापुढे घरपट्टीत दरवर्षी वाढ होणार हे नक्की आहे. या नव्या तरतुदीनुसार घरपट्टी आकारणीच्या संगणकीय प्रणालीतही बदल केले जाणार आहेत.