युक्रेन -रशिया युद्धामुळे युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षण अर्ध्यावर सोडण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेण्यासाठी राज्यातील स्वायत्त विद्यापीठांमध्ये सरकारच्या सूचना व नियमानुसार प्रवेश देण्यात येणार आहे, अशी माहिती केएलई संस्थेचे कार्याध्यक्ष व कोड युनिकचे (कर्नाटकातील सर्व स्वायत्त विद्यापीठे) अध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांनी दिली.
युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धामुळे भयभीत झालेल्या हजारो भारतीय वैद्यकीय विद्यार्थ्यांना केंद्र सरकारने ऑपरेशन गंगाद्वारे स्वदेशी आणण्यासाठी अहोरात्र परिश्रम चालवले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वाधिक संख्येत भारतीय वैद्यकीय विद्यार्थ्यांना मायदेशी सुरक्षित आणण्यासाठी चालविलेले कार्य अप्रतिम आहे. याबद्दल पंतप्रधान मोदी व त्यांच्या पथकाचे कौतुक करावे तितके थोडेच आहे, असे डॉ. कोरे पुढे म्हणाले.
युद्धामुळे भारतीय वैद्यकीय विद्यार्थी अनेक समस्यांना सामोरे जात आहेत. या समस्या दूर करण्यासाठी पंतप्रधान मोदी वेळोवेळी प्रयत्न करीत आहेत.
विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेण्यात कोणती समस्या येऊ नये यासाठी केंद्र सरकारने काही उपक्रम हाती घेतले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी निराशा दूर करून धैर्याने राहावे. त्यामुळे आपले वैद्यकीय शिक्षण मायदेशी भारतात पूर्ण करणे त्यांना शक्य होईल, असे डाॅ. प्रभाकर कोरे यांनी म्हंटले आहे.