बेळगाव शहरातील मोकाट कुत्र्यांच्या नसबंदी मोहिमेसाठी कंत्राटदार निश्चिती येत्या 20 एप्रिल रोजी होणार असून कुत्र्यांची नसबंदी व अँटी रेबीज लसीकरण तसेच आजारी व रेबीजची लागण झालेल्या कुत्र्यांची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेने काल बुधवारी ई -निविदा काढली आहे.
सदर निविदा प्रक्रिया 20 एप्रिल रोजी पूर्ण होणार असून निविदा दाखल करण्याची अंतिम तारीख 16 एप्रिल आहे. निविदांची तांत्रिक पडताळणी 18 एप्रिलला होणार आहे. पडताळणीमध्ये दोन किंवा त्यापेक्षा जास्त निविदा वैध ठरल्या तर त्या 20 तारखेला उघडल्या जाणार आहेत. निविदा प्रक्रिया यशस्वी ठरली तर अडीच वर्षानंतर प्रथमच शहरात पुन्हा कुत्र्यांची नसबंदी मोहीम सुरू होणार आहे.
शहरात मोकाट कुत्र्यांची समस्या गंभीर बनली आहे. मोकाट कुत्र्यांचा उपद्रवाबाबत तक्रारी वाढल्यामुळे त्याची गांभीर्याने दखल घेत महापालिकेने मोकाट कुत्र्यांच्या नसबंदीसाठी अर्थसंकल्पात 60 लाख रुपयांची तरतूद केली आहे.
त्यामुळेच आरोग्य विभागाने तातडीने नसबंदी मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या सोमवारी आरोग्य विभागाने नसबंदी मोहिमेसाठी दिलेला प्रस्ताव आयुक्तांनी मंजूर केल्यामुळे पुढील कार्यवाही सुरू झाली आहे.
नसबंदी मोहिमेत मोकाट कुत्र्यांना अँटी रेबीज लसही दिली जाणार आहे. ही लस दिल्यामुळे एखाद्या मोकाट कुत्र्याने कोणास चावा घेतला तरी संबंधितांना धोका उद्भवणार नाही, असे महापालिकेचे म्हणणे आहे.