आरसीयु अर्थात राणी चन्नम्मा विद्यापीठांमध्ये भूगोल शास्त्र व डिजिटल कॅरिटोग्राफीचे कौशल्य विकास केंद्र स्थापण्यासाठी आगामी अर्थसंकल्पात अनुदानाची तरतूद करावी, अशी मागणी राज्य शहर पाणीपुरवठा मलनिस्सारण मंडळाच्या संचालिका दीपा कुडची यांनी केली आहे.
विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाच्या पदवीदान समारंभानिमित्त गेल्या गुरुवारी बेळगाव दौऱ्यावर आलेले उच्च शिक्षण मंत्री तथा कौशल्य विकास मंत्री डाॅ. सी. एन. अश्वथनारायण यांना भाजप नेत्या दीपा कुडची यांनी उपरोक्त मागणीचे निवेदन सादर केले आहे.
राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या अखत्यारीत 389 महाविद्यालयांचा समावेश असून सुमारे 1 लाख 35 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
विद्यापीठात भूगोल शास्त्र व डिजिटल कॅरिटोग्राफीचे कौशल्य ज्ञान विकसित करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कौशल्य विकास केंद्र स्थापने गरजेचे आहे. त्यासाठी राज्याच्या 2022 -23 सालच्या अर्थसंकल्पात 4.5 कोटी रुपये अनुदानाची तरतूद करावी, अशा आशयाचा तपशील दीपा कुडची यांनी सादर केलेल्या निवेदनात नमूद आहे.