कन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीजच्या (सीआयआय) बेळगाव जिल्हा नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली असून 2022 -23 सालासाठी नुतन अध्यक्षपदी स्नेहम इंटरनॅशनलचे व्यवस्थापकीय संचालक अनिष मेत्राणी यांची तर उपाध्यक्षपदी एक्सपर्ट व्हाॅल्व ॲन्ड इक्विपमेंट प्रायव्हेट लि.चे विनायक लोकुर यांची निवड करण्यात आली आहे.
सीआयडी कर्नाटक राज्य कार्यकारिणीच्या उपाध्यक्षा श्रीमती ज्योती प्रधान यांनी बेळगाव जिल्हा शाखेचे मावळते अध्यक्ष दिलीप चांडक यांच्या उपस्थितीत नूतन कार्यकारिणीची घोषणा केली. यावेळी बोलताना बेळगाव आणि परिसरात औद्योगिक क्षेत्राच्या भरभराटीला भरपूर वाव आहे. या भागाच्या अधिकाधिक औद्योगिक उत्कर्षासाठी तसेच सर्वसमावेशक आणि वैविध्यपूर्ण कामगार वर्गाच्या संवर्धनासाठी हातात हात घालून एकजुटीने सर्वांनी कार्यरत रहावे, असे आवाहन करून ज्योती प्रधान यांनी समयोचित विचार व्यक्त केले. त्याचप्रमाणे संघटनेच्या बेळगाव जिल्हा शाखेच्या कार्याबद्दल प्रशंसोद्गार काढले.
यावेळी जिल्ह्याचे माजी अध्यक्ष जयंत हुंबरवाडी यांच्या अध्यक्षतेखाली ‘कर्नाटकातील वेगवान औद्योगिक वाढ’ या विषयावर पॅनल चर्चा पार पडली. या चर्चेमध्ये केजीके इंजीनियरिंग, सुरेश अंगडी एज्युकेशन फौंडेशन आणि प्रसिशन केपीओ सोल्युशन्सच्या प्रतिनिधी वक्त्यांनी आपले विचार मांडले.
यावेळी झालेल्या चर्चेत बेळगावला महत्त्वाचे उत्पादन केंद्र बनविण्यासाठीचे कांही दृष्टीकोन मांडण्यात आले. तसेच त्या अनुषंगाने गंभीर घटक शोधून काढावेत आणि बेळगावची बलस्थाने समजून घेण्यासाठी एखाद्या संशोधन संस्थेला पाचारण केले जावे, असा सल्लाही पॅनलने दिला.
या सत्राला बेळगाव सीआयआयच्या ज्येष्ठ सदस्यांसह औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांनी हजेरी लावली होती. या सर्वांनी संघटनेच्या नव्या नेतृत्वाचे स्वागत करून अभिनंदन केले.