बेळगाव महापालिकेचा कारभार अधिकारी चालवत आहेत गेल्या तीन वर्षापासून बेळगाव मनपा मध्ये सभागृह अस्तित्वात नसून हा मनपाचा कारभार प्रशासक गेल्या तीन वर्षापासून सांभाळत आहेत.
बेळगाव महापालिकेतचे पहिले सभागृह 1984 साली अस्तित्वात आल्यापासून पहिल्यांदाच गेली सलग 3 वर्षे महापालिकेचे कामकाज प्रशासकांकडून चालविण्यात येत आहे. बेळगाव महापालिकेतील लोकनियुक्त सभागृहाचा कार्यकाळ संपून काल 10 मार्च रोजी 3 वर्षांचा कालावधी लोटला आहे.
बेळगाव महापालिका 1974 साली अस्तित्वात आली. त्यानंतर सभागृह अस्तित्वास येण्यास तब्बल आठ वर्षे लागली, म्हणजे 1984 साली महापालिकेची पहिली निवडणूक झाली. त्यावेळी पहिले सभागृह अस्तित्वात आले. त्यानंतर डिसेंबर 2005 मध्ये महापालिका बरखास्त झाली होती. तथापि त्यावेळी मार्च 2008 पर्यंत सव्वा दोन वर्षे महापालिकेत प्रशासक नियुक्त होते. बेळगाव महापालिका पुन्हा डिसेंबर 2011 साली बरखास्त झाली आणि त्यावेळी देखील मार्च 2014 पर्यंत म्हणजे सव्वा दोन वर्षे प्रशासक नियुक्त होते. पुढे 2005 साली महापालिका बरखास्त झाल्यानंतर पावणे दोन वर्षानंतर म्हणजे सप्टेंबर 2007 मध्ये महापालिका निवडणूक झाली आणि सहा महिन्यांनी म्हणजे मार्च 2008 मध्ये सभागृह अस्तित्वात आले. बेळगाव महापालिका पुन्हा 2011 मध्ये बरखास्त झाल्यानंतर सव्वा वर्षांनी म्हणजे मार्च 2013 मध्ये महापालिका निवडणूक होऊन एक वर्षाने म्हणजे मार्च 2014 मध्ये सभागृह अस्तित्वात आले होते.
यावेळी लोकनियुक्त सभागृहाचा कार्य काळ संपून 3 वर्ष झाली तरीही सभागृह अद्याप अस्तित्वात आलेले नाही. गेल्या 15 मार्च 2019 रोजी महापालिकेवर प्रशासक नियुक्त करण्यात आले. येत्या 15 मार्चला प्रशासकांच्या नियुक्तीला 3 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होणार आहे. मात्र एकंदर परिस्थिती पाहता 15 मार्चपर्यंत महापौर निवडणूक होऊन नवे सभागृह अस्तित्वात येण्याची शक्यता नाही. दरम्यान, महापालिकेतील लोकनियुक्त सभागृहाचा कार्यकाळ 10 मार्च 2019 रोजी संपला. त्यानंतर पाच दिवसांनी म्हणजे 15 मार्च रोजी महापालिकेवर प्रशासक नियुक्त करण्यात आला. त्यानंतर महापालिका कायद्यातील तरतुदीनुसार सहा महिन्यात महापालिका निवडणूक होणे आवश्यक होते. पण ती झाली नाही.
बेळगाव शहराची प्रभाग पुनर्रचना व आरक्षण याबाबत नवी अधिसूचना काढण्याची लेखी ग्वाही राज्य शासनाने सप्टेंबर 2019 मध्येच उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठाला दिली होती. तथापि ती अधिसूचना निघाली नाही. त्यामुळे निवडणूक लांबणीवर पडली. गेल्या ऑगस्ट 2021 मध्ये निवडणूक जाहीर झाली. त्यानंतर 6 सप्टेंबर रोजी निकाल लागला. निवडणूक होऊन 6 महिन्यांचा कालावधी संपला. तथापि अजूनही महापालिकेवर प्रशासकच कार्यरत आहेत.
बेळगावच्या प्रादेशिक आयुक्तांना मार्च 2019 मध्ये महापालिका प्रशासन म्हणून नियुक्त करण्यात आले होते. त्यानंतर डिसेंबर 2019 मध्ये प्रादेशिक आयुक्तांना हटवून जिल्हाधिकार्यांना प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आले. तेंव्हापासून महापालिकेच्या कामकाजाची सूत्रे जिल्हाधिकार्यांच्या हातीच आहेत.