बेळगाव शहरातील भवानीनगर रोड या रस्त्यावर आज सकाळी एका रियल इस्टेट व्यावसायिकाचा खून झाल्याची घटना उघडकीस आली असून पोलीस अधिकारी सर्वांगाने माहिती गोळा करून या प्रकरणाचा तपास करत आहेत, अशी माहिती पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांनी दिली.
पोलीस आयुक्तालयामध्ये आज आयोजित पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ही माहिती दिली. पोलीस आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार आज मंगळवारी सकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास बेळगाव ग्रामीण पोलिसांना एक फोन आला. फोनवरील व्यक्तीने भवानी रोड रस्त्यावर कारगाडी शेजारी एक व्यक्ती खून झालेल्या अवस्थेत खाली पडली असल्याचे सांगितले. तेंव्हा पोलिस अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलला धाडला.
घटनास्थळी पोलिस अधिकाऱ्यांनी चौकशी केली असता मयत इसम हा मंडळी रोड वरील रहिवासी असून त्याचे नांव राजू मल्लाप्पा दोड्डबोमन्नावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच त्याच्या पायाला गंभीर दुखापती झाल्या आहेत, असे आयुक्तांनी सांगितले.
राजू दोड्डबोमन्नावर हा गेल्या कांही वर्षापासून रियल इस्टेट आणि अपार्टमेंट बांधकाम क्षेत्रात काम करत होता. मयत राजूच्या पत्नीने केलेल्या तक्रारीवरून बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खुनाचे निश्चित कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस अधिकारी सर्वांगाने माहिती गोळा करत असून हा खून वैयक्तिक पूर्ववैमनस्यातून झाला की व्यवसायिक स्पर्धेतून याचा शोध घेतला जात आहे. तथापि आम्ही लवकरात लवकर या प्रकरणाचा छडा लावून आरोपींना गजाआड करू असा विश्वास पोलीस आयुक्त डाॅ. एम. बी. बोरलिंगय्या यांनी व्यक्त केला आहे.