नवी दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या आशियाई कुस्ती निवड चांचणीमध्ये चमकदार कामगिरी नोंदविल्यामुळे बेळगाव भांदूर गल्ली तालमीचा पैलवान अर्जून हलाकुर्ची याची मंगोलिया येथे होणाऱ्या वरिष्ठ आशियाई कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे.
नवी दिल्ली येथे गेल्या 24 मार्च रोजी झालेल्या आशियाई कुस्ती निवड प्रक्रियेमध्ये ग्रीको-रोमन कुस्ती प्रकारात पैलवान अर्जुन हलाकुर्ची याने 55 किलो वजनी गटात अतिशय उत्तम कामगिरी बजावली.
यामुळे आता मंगोलिया येथे पुढील महिन्यात 18 एप्रिल रोजी होणाऱ्या आशियाई कुस्ती स्पर्धेसाठी अर्जुन यांची भारतीय कुस्ती संघात निवड झाली आहे.
पैलवान अर्जुन हलाकुर्ची हा सध्या थ्री इएमई सेनादल भोपाळ स्पोर्ट्स या ठिकाणी कार्यरत आहे. त्याने यापूर्वी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील ग्रीको-रोमन कुस्ती स्पर्धांमध्ये अनेक बक्षिसे मिळवली आहेत.
त्याला भांदूर गल्ली तालमीचे वस्ताद राष्ट्रीय सुवर्ण पदक विजेते मल्ल मारुती घाडी व सेनादलाचे आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षक विनायक दळवी यांचे मार्गदर्शन लाभत आहे. उपरोक्त निवडीबद्दल पै. अर्जुन हलाकुर्ची याचे भांदूर गल्ली तालमीमध्ये तसेच कुस्तीप्रेमींकडून अभिनंदन होत आहे.