बेळगावसाठी आजचा दिवस अभिमानाचा म्हणावा लागेल, कारण आज जागतिक महिला दिनानिमित्त बेळगाव जिल्ह्यातील एका कर्तुत्ववान महिलेचा राष्ट्रपतींच्या हस्ते नारी शक्ती पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. श्रीमती शोभा गस्ती असे या महिलेचे नांव आहे.
श्रीमती शोभा गस्ती यांनी महिला अभिवृद्धी आणि संरक्षण संस्था (एमएएसएस -मास) सुरू केली आहे. या बिगर सरकारी संघटनेच्या माध्यमातून शोभा गस्ती या जिल्ह्यातील तीन तालुक्यांमधील 360 गावांमध्ये कार्य करत आहेत.
देवदासी प्रथेविरुद्ध कार्यरत असलेल्या मास या संस्थेच्या माध्यमातून गस्ती यांनी जिल्ह्यातील तब्बल 3600 हून अधिक महिलांना देवदासी प्रथेतून मुक्त करून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणले आहे.
देवदासी प्रथेचे समाजातून समूळ उच्चाटन व्हावे, महिलांनी अंधश्रद्धेला बळी न पडता आपला आत्मसन्मान जपावा आणि मुलींचे शिक्षण याबाबत शोभा गस्ती सातत्याने जनजागृती करत असतात.
याखेरीज बाल विवाह, मुलांची तस्करी आणि त्यांच्याशी गैरवर्तन यांच्या विरोधातील त्यांचा लढा देखील सुरूच आहे. जागतिक महिला दिनानिमित्त आज देशातील निवडक कर्तृत्ववान महिलांचा नवी दिल्ली येथे राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
या सत्कार मूर्तीमध्ये बेळगावच्या शोभा गस्ती यांचाही समावेश होता. शोभा गस्ती यांच्या उपरोक्त आदर्शवत कार्याची दखल घेऊन त्यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते नारी शक्ती पुरस्कार प्रदान करून सन्मान करण्यात आला. सदर पुरस्काराबद्दल शोभा गस्ती यांचे सर्व थरात अभिनंदन होत आहे.