हिजाब संदर्भात कर्नाटक उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाबाबत नाराजी व्यक्त करण्यासाठी मुस्लिम धार्मिक आणि सामाजिक संघटनांनी आज गुरुवारी पुकारलेल्या कर्नाटक बंदला बेळगावात उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.
कर्नाटकचे अमीर -ए -शरियत (मुख्य पुजारी) मौलाना सगीर अहमदखान रशीद यांनी राज्यव्यापी बंदची हाक देण्याबरोबरच बंद शांततेने पाळण्याचे आवाहन केले आहे. त्या आवाहनाला बेळगाव शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील मुस्लिम बांधवांनी उत्स्फूर्त पाठिंबा देताना आज आपले व्यवहार बंद ठेवले होते. बेळगाव शहरातील हॉटेल नियाजसह मुस्लिम धर्मीयांची अन्य हॉटेल्स रेस्टॉरंट्स आणि दुकाने आज दिवसभर बंद ठेवण्यात आली होती.
राज्यव्यापी बंदच्या आवाहनामुळे मुस्लिम धर्मीयांची दुकाने आणि व्यवहार ज्या ठिकाणी जास्त प्रमाणात आहेत अशा शहरातील खडेबाजार, घी गल्ली, खडक गल्ली, खंजर गल्ली, गांधीनगर, न्यू गांधीनगर, उज्वलनगर, माळी गल्ली, कोर्ट रस्ता आदी ठिकाणच्या रस्त्यावर दिवसभर शुकशुकाट पहावयास मिळाला.
त्याप्रमाणे मध्यवर्ती बस स्थानकका नजीकची दुकाने, शाहूनगर, नेहरूनगर, सुभाषनगर आदी भागातील मुस्लिम बांधवांची दुकाने आज पूर्णपणे बंद होती. मोर्चा, मिरवणूक काढण्यास परवानगी नसल्यामुळे जिल्हाधिकारी अथवा अन्य कोणत्याही कार्यालयाला निवेदन सादर करण्यात आले नाही.
सर्व मुस्लिम धर्मीयांना स्वयंप्रेरणेने आपापले व्यवहार बंद ठेवून कर्नाटक बंदला संपूर्ण पाठिंबा व्यक्त केला, असे अंजुमन इस्लाम संस्थेचे अध्यक्ष राजू सेठ यांनी सांगितले.