Tuesday, January 14, 2025

/

बेळगावची ही संस्था करणार स्वतःचा उपग्रह प्रक्षेपित

 belgaum

पुढील 5 वर्षात स्वतःच्या उपग्रह अवकाशात सोडणे हे भरतेश एज्युकेशन ट्रस्टचे (बीईटी) लक्ष्य असल्याची माहिती बीईटीचे विश्वस्त विनोद दोड्डण्णावर यांनी दिली.

हालगा येथील श्रीमती जीवनव्वा दोड्डण्णावर भारतीय हायस्कूल येथे काल मंगळवारी आयोजित अटल टिंकरिंग लॅबच्या (एटीएल) उद्घाटन समारंभाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षक मतदार संघाचे आमदार अरुण शहापूरकर यांच्यासह सन्माननीय अतिथी म्हणून जिल्हा शिक्षण अधिकारी बसवराज नलतवाड, संतमीरा शाळेचे चेअरमन परमेश्वर हेगडे आणि बेळगाव ग्रामीणचे गटशिक्षणाधिकारी आर. पी. जुट्टणावर उपस्थित होते.

राष्ट्राचे शाश्वत विकास ध्येय लक्षात घेऊन भरतेशच्या शाळेमध्ये अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज अशा या एटीएल प्रयोगशाळेची निर्मिती करण्यात आली असून या ठिकाणी अवकाश निरीक्षणासाठी उच्च तंत्रज्ञानाने निर्मित स्वयंचलित संगणीकृत दुर्बिन आहे. या दुर्बिणीतून अवकाशातील कोणत्याही ग्रह-ताऱ्यांचे निरीक्षण करता येते. स्वयंचलित असलीतरी ही दुर्बीण हाताने देखील हाताळता येते. विद्यार्थीवर्ग या दुर्बिणीची क्षमता पाहून आश्चर्यचकित होत असून अवकाश निरीक्षणासाठी गटागटाने गर्दी करत असतो.

Bhartesh

सदर एटीएलचे स्वतःचे हवामान केंद्र आहे. या केंद्रात रोजच्या रोज तापमान, वाऱ्याची गती, दिशा, हवेतील बाष्पता आणि पर्जन्यवृष्टीची नोंद ठेवली जाते. ज्यामुळे विद्यार्थ्यांना हवामानातील बदल शोधता येतो आणि त्यांना विविध पद्धतीच्या वातावरणाचे महत्वही समजते.

जगातील महासत्ता बनण्याचे भारताचे लक्ष्य ध्यानात घेऊन भरतेश एज्युकेशन ट्रस्टने देखील तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात महत्त्वाकांक्षी मार्ग निवडला आहे. आता येत्या पाच वर्षात एटीएलच्या माध्यमातून स्वतःचा उपग्रह अवकाशात प्रक्षेपित करण्याचे भरतेश ट्रस्टचे ध्येय आहे.

अवकाशात प्रक्षेपित केला जाणारा हा लघु क्षमतेचा उपग्रह प्रामुख्याने शैक्षणिक कारणासाठी वापरला जाणार आहे. शाळेतील तीन अटल टिंकरिंग लॅबस् या प्रयोगशाळा आपल्या शेकडो विद्यार्थी -विद्यार्थिनींमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान जाणून घेण्याच्या दृष्टीने नवा उत्साह निर्माण करणार्‍या ठरत आहेत.

शहरातील अन्य शाळा देखील आपल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना मंत्रमुग्ध करणारे विज्ञान आणि तंत्रज्ञानचे जग पाहण्यासाठी या प्रयोगशाळांना भेट देण्यास आणि तेथील उपकरणे हाताळण्यास पाठवू शकतात. मात्र त्यासाठी त्यांना प्रथम भरतेश संस्थेशी संपर्क साधावा लागणार आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.