दिल्ली ते बेळगाव या दैनंदिन थेट विमान सेवेला आज रविवारपासून प्रारंभ झाला असून आज पहिल्याच दिवशी या सेवेला जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे.
आज दिल्लीहून 114 प्रवासी बेळगावला आले आणि 167 प्रवासी राजधानी दिल्लीच्या दिशेने रवाना झाले.
स्पाइस जेट कंपनीने आपल्या 189 आसनी विमानाद्वारे आजपासून बेळगाव ते दिल्ली थेट विमानसेवा सुरू केली आहे. स्पाइस जेट बी737 -700 या पहिल्या विमानाचे आज सकाळी 114 प्रवाशांसह दिल्लीहून बेळगावला आगमन झाले आणि परतीच्या प्रवासात हे विमान 167 प्रवाशांना घेऊन गेले.
ही विमानसेवा आता रोजच्यारोज सुरू राहणार असून दररोज सकाळी 6:05 वाजता विमान दिल्लीहून प्रस्थान करेल आणि बेळगावला सकाळी 8:45 वाजता पोहोचेल.
बेळगावहून पुन्हा हे विमान सकाळी 9:15 वाजता प्रस्थान करेल आणि दिल्ली येथे सकाळी 11:45 वाजता पोहोचेल. दिल्ली ते बेळगाव हवाई प्रवासाचे अंतर 2 तास 40 मिनिटात पूर्ण केले जाईल.
विविध कारणास्तव राजधानी दिल्ली येथे जाऊ इच्छिणाऱ्यांसाठी आजपासून सुरू झालेली ही विमानसेवा प्रोत्साहन देणारी आणि अत्यंत सोयीची ठरणार आहे.