हवामानातील बदलाचा अंदाज वर्तवण्याबरोबरच हवामान शास्त्र आणि संशोधनासाठी असणारे बेळगावचे स्वयंचलित हवामान केंद्र (एडब्ल्यूएस) गेल्या 14 नोव्हेंबर 2021 पासून बंद आहे आणि याला पुण्याच्या एडब्ल्यू एस सर्व्हरकडून दुजोरा मिळाला आहे.
देशातील स्वयंचलित हवामान केंद्रांच्या यादीमध्ये बेळगाव केंद्राचे नांव आढळून न आल्यामुळे माहिती हक्क कायदा अंतर्गत विचारणा केली असता उपरोक्त माहिती उपलब्ध झाली आहे.
मोजमाप उपकरणांकडून प्राप्त निरीक्षण स्वयंचलितपणे प्रसारित करणे अथवा संकलीत करणे ही स्वयंचलित हवामान केंद्राची (एडब्ल्यूएस) परिभाषा आहे. एडब्ल्यूएस केंद्रामध्ये मोजमाप केलेले हवामान घटक सेंसर मार्फत इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये परिवर्तित केले जातात.
ते सिग्नल मग प्रक्रिया करून हवामानाच्या माहितीत रूपांतरित केले जातात. त्यानंतर अंतिम माहिती वायर अथवा रेडिओ किंवा स्वयंचलित रेकॉर्डिंग माध्यमात साठवली जाते. हा ईडब्ल्यूएसचा थोडक्यात परिचय आहे.