बेळगाव जिल्ह्यातील 9 वर्षापासूनच्या मोठ्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमधील आरोपींवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (एसीबी) दोषारोप पत्र दाखल केले जावे, अशी मागणी आम आदमी पार्टीतर्फे (आप) करण्यात आली असून तशा आशयाचे निवेदन आज सोमवारी सकाळी एसीबी जिल्हा पोलीस प्रमुखांना सादर करण्यात आले.
बेळगावच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गेल्या 9 वर्षात मालमत्ता हडपण्याचा प्रकरणांसह भ्रष्टाचाराची विविध प्रकरणे उघडकीस आणली असली तरी या प्रकरणातील सर्व आरोपींवर दोषारोपपत्र मात्र दाखल करण्यात आलेले नाही.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील कर्मचारी भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीस आणण्याव्यतिरिक्त इतर कोणतेही काम करत नाहीत. कायद्यानुसार तक्रार दाखल झाल्यापासून 6 महिन्याच्या आत आरोपींवर दोषारोपपत्र दाखल झाले पाहिजे असे नमूद करण्याबरोबरच भ्रष्टाचाराची पाळेमुळे खणून काढण्याऐवजी एसीबी अधिकारी भ्रष्ट राजकारण्यांना संरक्षण देण्याचे काम करतात असा आरोप निवेदनात नमूद आहे.
लहानसहान भ्रष्टाचाराच्या प्रकरणात आरोपींवर दोषारोप दाखल करणारे एसीबीचे अधिकारी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करणारे भू -माफिया आणि भ्रष्टाचाराला खतपाणी घालणाऱ्या भाजप नेत्यांकडे कानाडोळा करतात ही अतिशय खेदजनक बाब आहे. आता येत्या आठवड्याभरात बेळगावातील नऊ वर्षातील भ्रष्टाचाराच्या तक्रारीसंदर्भात दोषारोपपत्र दाखल झाली नाहीत तर उग्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
एसीबीच्या जिल्हा पोलीस प्रमुखांना निवेदन सादर करतेवेळी आम आदमी पार्टीचे (आप) उत्तर विभाग प्रमुख राजकुमार टोपण्णावर, जिल्हाध्यक्ष विजय पाटील, अनिस सौदागर, रिजवान मकानदार, बशीर अहमद जमादार, महावीर अनगोळ आदींसह आपचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.