बेळगाव शहरानजीकच्या गणेशपुर रोडवरील मुख्य जलवाहिनीला गुड शेफर्ड शाळेसमोरील रस्ता दुभाजकाखाली गळती लागली असून गेल्या आठ दिवसापासून लागलेल्या या गळतीमुळे लाखो लिटर पाणी वाया जात असून प्रशासन व एल अँड टी कंपनीचे याकडे दुर्लक्ष होत असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
गणेशपुर रोड या दुपदरी मार्गावर गुड शेफर्ड इंग्लिश मीडियम शाळेसमोरील रस्त्यावर असलेल्या मुख्य जलवाहिनीला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. रस्त्यावरील दुभाजकाच्या नेमकी खाली ही गळती लागल्यामुळे दुभाजकाच्या दोन्ही बाजूंनी रस्त्यावर दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. गेल्या आठ दिवसापासून इतक्या या पद्धतीने गळती लागून मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत असताना देखील प्रशासनाचे आणि शहर पाणीपुरवठा व्यवस्थापन सांभाळणाऱ्या एल अँड टी कंपनीचे मात्र याकडे साफ दुर्लक्ष झाल्याचे पहावयास मिळत आहे.
- यंदा पुरेसा पाऊस झाला असला तरी उन्हाळ्यात एप्रिल-मे महिन्यात पाणी टंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यासाठी पाण्याची नासाडी होऊ नये यासाठी प्रशासनाने खरे तर आत्तापासून सतर्क राहणे गरजेचे आहे. तथापि बेळगावचे प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे.
मुख्य जलवाहिनीला लागलेला गळतीमुळे गुड शेफर्ड शाळेसमोरील गणेशपुर रोड या रस्त्याचा जवळपास 50 मीटर अंतराचा दोन्ही बाजूचा रस्ता गेल्या आठ दिवसापासून पाण्याने भिजून गेला असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. साचलेल्या पाण्यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना देखील त्रास सहन करावा लागत आहे.
साचलेल्या पाण्यातून वाट काढावी लागत असल्यामुळे विशेषकरून दुचाकी वाहन चालक आणि पादचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. तरी लोकप्रतिनिधींसह संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन युद्धपातळीवर गणेशपुर रोडवरील जलवाहिनी दुरुस्तीचा आदेश द्यावा आणि होणारी लाखो लिटर पाण्याची नासाडी थांबवावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे.