मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी 19 वाहन (वाहन नोंदणीसाठी) आणि 11 सारथी (चालक परवान्यासाठी) अशा एकूण 30 नव्या वाहतूक सेवा सुरू केल्या आहेत. या ऑनलाईन सेवांमुळे आरटीओवरील ताण 70 टक्क्यांनी कमी होणार असून दरवर्षी सुमारे 70 कोटी कागदपत्रांची बचत होणार आहे. ऑनलाइन ही निश्चितच सुलभ सेवा असली तरी प्रत्यक्षात खरी परिस्थिती वेगळीच आहे.
शहरातील एक वाहन चालक इनाम सौदागर यांनी गेल्या 20 जानेवारी रोजी आपल्या चालक परवान्याचे (ड्रायव्हिंग लायसन्स) नूतनीकरण करून घेतले. त्याचप्रमाणे त्यांचा चालक परवाना मुद्रित झाला असल्याचा संदेशही त्यांना 29 जानेवारी रोजी मिळाला. तथापि तेंव्हापासून आजतागायत त्यांचा चालक परवाना त्यांच्याकडे पाठवण्यात आलेला नाही. आपला नूतनीकरण केलेला चालक परवाना आपल्याला अद्याप का मिळाला नाही? यासाठी सौदागर यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले.
शेवटी आपण आरटीओ सुपरिटेंडेंटशी संपर्क साधला असता त्यांनी व्हाट्सअपवर ‘सरकारने चालक परवाना घरपोच पाठविण्यासाठी निधी उपलब्ध केलेला नाही’ असे अधिकृत उत्तर दिल्याचे सौदागर यांनी सांगितले.
चालक परवाना घरपोच पाठविण्यासाठी आवश्यक असलेले शुल्क भरण्यास आपण तयार आहोत असे सौदागर यांनी सांगून देखील आरटीओ खाते चालक परवाना घरपोच पाठविण्यासाठी आमच्याकडे निधी नसल्याचे सांगताहेत. प्रादेशिक परिवहन अर्थात आरटीओ सारख्या एका जबाबदार सरकारी खात्याकडून या पद्धतीने वाहनचालकांना हास्यास्पद उत्तर मिळत असल्याबद्दल सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे.