रेल्वे मार्ग दुपदरीकरण्यासाठी अवजड अवजड रेल्वे रूळ घेऊन जाणाऱ्या मालवाहू रेल्वेगाडीमुळे वाहतुकीची मोठी कोंडी झाल्याची घटना आज दुपारी टिळकवाडी येथील तिसऱ्या रेल्वे गेट येथे घडली.
रेल्वे रुळांची वाहतूक करणाऱ्या विशिष्ट प्रकारच्या मालवाहू रेल्वेमुळे आज दुपारी टिळकवाडी येथील तिसऱ्या रेल्वे गेटच्या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होऊन वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागला. बेळगाव ते खानापूर दरम्यानच्या रेल्वेमार्ग दुपदरी करणाचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी विशिष्ट प्रकारच्या मालवाहू रेल्वेतून आज रेल्वेमार्ग शेजारी नवे रेल्वे रूळ टाकण्याचे मार्ग सुरू होते.
ठराविक अंतरावर रेल्वेतील रूळ खाली उतरविण्यात येत असल्यामुळे मालवाहू रेल्वेला अत्यंत संथ गतीने मार्गक्रमण करावे लागत होते. रेल्वे रूळ खाली उतरवणे हे वेळ लागणारे परिश्रमाचे काम असल्यामुळे आज दुपारी संबंधित मालवाहू रेल्वे तिसऱ्या रेल्वे गेट येथे बराच काळ थांबून होती.
रेल्वे गेटच्या ठिकाणी बराच काळ थांबून त्यानंतर पुन्हा संथगतीने मालवाहू रेल्वे पुढे सरकत असल्यामुळे रेल्वे गेटच्या दोन्ही बाजूच्या रस्त्यावरील वाहतूक खोळंबली होती. दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. त्यानंतर रहदारी पोलिसांनी या ठिकाणची वाहतूक अन्य मार्गाने वळवली. एकंदर इतक्या कासवगतीने जाणारी मालवाहू रेल्वे आणि रेल्वेतून उतरविण्यात येणारे अवजड रेल्वे रूळ पाहण्याचा अनुभव बेळगावकरांनी आज प्रथमच घेतला. या पद्धतीच्या वेळ काढू कामामुळे वाहतुकीचा खोळंबा होऊ शकतो हे ध्यानात घेऊन रेल्वे खात्याने त्याची पूर्वकल्पना देणे आवश्यक होते, अशी प्रतिक्रिया वाहनचालकांमध्ये व्यक्त होत होती.
अतिशय संथ गतीने जाणारी मालवाहू रेल्वे आणि त्यामधून उतरवण्यात येणारे अवजड रेल्वे रूळ या कामामुळे टिळकवाडीतील पहिल्या व दुसऱ्या रेल्वे गेटच्या ठिकाणी देखील वाहतुकीचा खोळंबा झाला असला तरी या कामामुळे भविष्यात चांगल्या रेल्वे सेवेचा कायमचा लाभ होणार आहे हे विसरून चालणार नाही.