धारवाड जिल्हाधिकार्यांच्या (डीसी) निवासस्थान आवारातील चंदनाचे झाड चोरट्यांनी शिताफीने तोडून लंपास केल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली आहे.
गेल्या रविवारी रात्री ते सोमवारी सकाळपर्यंतच्या कालावधीत धारवाड जिल्हाधिकाऱ्यांच्या निवास्थान आवारात असलेले चंदनाचे झाड चोरट्यांनी इलेक्ट्रिक कटरच्या सहाय्याने खालच्या तळापासून कापून हातोहात लंपास केले. सदर झाड 20 वर्षांपूर्वी जिल्हाधिकारी निवासस्थानाच्या आवारात लावण्यात आले होते. या चंदनाच्या झाडाची चोरी झाल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या घरी काम करणाऱ्या एका कामगारांच्या निदर्शनास येताच त्याने ती बाब आपल्या वरिष्ठांना कळवली.
चंदनाचे झाड रातोरात तोडून लंपास केल्याची माहिती मिळताच रेंज फॉरेस्ट ऑफिसर आर. एस. उप्पार यांनी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच या प्रकरणी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आले असल्याचे सांगितले. दरम्यान, चक्क जिल्हाधिकाऱ्यांच्या निवास्थान आवारातील चंदनाच्या झाडाची चोरी झाल्यामुळे हा एक चर्चेचा विषय झाला आहे.
कांही वर्षांपूर्वी अशाच प्रकारची घटना बेळगावात घडली होती. त्यावेळी बेळगाव जिल्हाधिकारी निवासस्थान आवारातील एक पूर्ण वाढ झालेले चंदनाचे झाड चोरट्यांनी शिताफीने तोडून लांबविले होते.