Tuesday, May 7, 2024

/

‘बीम्सचे हायटेक रुग्णालयात रूपांतर करण्याचा प्रयत्न’

 belgaum

अलीकडच्या काळात बीम्स सरकारी हॉस्पिटलमध्ये विविध विकास कामांद्वारे मोठे बदल करून एकेकाळी अस्वच्छ -बकाल असलेल्या या हॉस्पिटलचा स्वच्छ, सुंदर आणि हवेशीर हॉस्पिटलमध्ये अविश्वसनीय कायापालट करण्यात आला आहे असे सांगून बीम्स सरकारी हॉस्पिटल राज्यात ‘नंबर वन’ करण्याचा माझा ध्यास आहे. यासाठी मला जनतेने सहकार्य करावे, अशी विनंती बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांनी केली आहे.

बीम्स सरकारी हॉस्पिटलच्या विकासासंदर्भात माहिती देताना आमदार ॲड. अनिल बेनके म्हणाले की, सहा महिन्यापूर्वी हे हॉस्पिटल पाहिलेल्यांनी आता जाऊन पहावे. त्यांना त्यांच्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही, इतकी सुधारणा या हॉस्पिटलमध्ये झाली आहे. बीम्स हॉस्पिटलमध्ये अलीकडच्या काळात मोठे बदल करून रंगरंगोटी बरोबरच हे हॉस्पिटल स्वच्छ, सुंदर आणि हवेशीर करण्यात आले आहे. बीम्सचे प्रशासक अमलान आदित्य बिश्वास, डाॅ. विवेकी, डॉ. ए. बी. पाटील, डॉ पुष्पा आदी सर्वांनी घेतलेल्या मेहनतीनंतर आज हे सरकारी हॉस्पिटल एका वेगळ्या रुपात पहावयास मिळते.

आज बीम्समध्ये डायलिसिस उपचार 24 तास सुरू आहेत. त्याचप्रमाणे एक्स-रे, एमआरआय, सीटी स्कॅन आदींसह लेबोरेटरीजच्या सर्व सेवा येथे 24 तास सुरू (24×7) असल्याचे पहावयास मिळतील. आजच्या घडीला या हॉस्पिटलमधील स्वच्छता दृष्ट लागेल इतकी चांगली आहे. सहा महिन्यांपूर्वी या हॉस्पिटलमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वच्छता व दुर्गंधी पसरलेली पहायला मिळत होती. मात्र आता रंगरंगोटीसह स्वच्छ -सुंदर असे हे हॉस्पिटल रुग्णसेवेसाठी सुसज्ज करण्यात आले आहे. येत्या काळात या ठिकाणचे नवे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल देखील कार्यान्वित होणार आहे. सदर 250 बेड्सचे हॉस्पिटल येत्या मे महिन्यात हस्तांतरित झाल्यानंतर या हॉस्पिटलमध्ये नागरिकांना कार्डिओलॉजी, यूरोलॉजी, प्लास्टिक सर्जरी, पेडियाट्रिक सर्जरी या सर्व शस्त्रक्रिया मोफत उपलब्ध होणार आहेत. बेळगावच्या बीम्स सरकारी हॉस्पिटलमध्ये पूर्वी उपचारासाठी 1 -2 तास वाट पाहावी लागत होती. मात्र आता अल्पावधीत तुमची पावती करून डॉक्टर तपासणीसाठी येतात. या ठिकाणच्या अन्नपदार्थ आहाराबद्दल बोलायचे तर वेगवेगळ्या प्रकारच्या रुग्णांना डॉक्टरांनी सुचवल्याप्रमाणे वेगवेगळे पौष्टिक दर्जेदार खाणे दिले जाते. एकंदर सर्वांगाने विकास साधून बीम्स सरकारी हॉस्पिटलचा कायापालट करण्यात आला आहे. मात्र यावर न थांबता हे हॉस्पिटल राज्यात ‘नंबर वन’ करण्याचा माझा ध्यास आहे. यासाठी मला जनतेने सहकार्य करावे अशी माझी कळकळीची विनंती आहे, असे आमदार ॲड. अनिल बेनके म्हणाले

 belgaum

बीम्सच्या इन्चार्ज निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. पुष्पा एम. जी. म्हणाल्या की, आमचे हे 1150 बेड्सचे हॉस्पिटल उत्तर कर्नाटकातील सर्वात मोठे सरकारी हॉस्पिटल आहे. बेळगाव हे महाराष्ट्र व गोवा राज्याच्या सीमेवर असल्यामुळे बीम्समध्ये उपचारासाठी येणार्‍या रुग्णांची संख्या मोठी आहे. परराज्यातील रुग्ण रात्रीअपरात्री चिंताजनक अवस्थेत येथे आणले जातात. मात्र त्यांच्यावर तात्काळ विभिन्न वैद्यकीय पथके निर्माण करून उपचार केले जातात असे सांगून हॉस्पिटलचे औषधालय आणि रक्तपेढी 24 तास सुरू असते, अशी माहिती डाॅ. पुष्पा यांनी दिली.Adv anil benake

बीम्सचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अण्णासाहेब पाटील यांनी आमच्या हॉस्पिटलमध्ये पूर्वी आयसीयु बेड्सची संख्या 25 ते 30 इतकीच होती. मात्र आत्ताच्या घडीला बीम्स हॉस्पिटलमध्ये 86 आयसीयू बेड्स व्हेंटिलेटर्ससह उपलब्ध आहेत. हॉस्पिटलमधील डायलेसिस उपचार 24×7 उपलब्ध असतात. अगदी मध्यरात्री सुद्धा रुग्णांचे डायलेसीस केले जाते असे सांगून हॉस्पिटलच्या नव्या आरओ प्लांट, टाटा विंगर ॲम्बुलन्स, अंतर्गत सुधारणा, विद्युतीकरण, सीसीटीव्ही कॅमेरे आदींसाठी आमदार ॲड. अनिल बेनके यांच्या प्रयत्नामुळे 1 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर झाले असल्याची माहितीही डॉ. पाटील यांनी दिली.

बीम्स हॉस्पिटलचे डीन डॉ. आर. जी. विवेकी यांनी काळजी, उपचार आणि संरक्षण हे बोधवाक्य घेऊन आम्ही सर्वजण काम करत आहोत असे सांगितले. या बोधवाक्यानुसार सर्वांना चांगल्या वैद्यकीय सेवा सुविधा मिळाव्यात यासाठी माझ्यासह हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक, मुख्य प्रशासकीय अधिकारी, निवासी वैद्यकीय अधिकारी असे आम्ही सर्वजण एकत्रित टीमवर्क करत आहोत असे सांगून बीम्स हॉस्पिटलमध्ये उत्तर कर्नाटकातील निवडक 100 ते 150 गरीब परंतु हुशार विद्यार्थ्यांना एमबीबीएस अभ्यासक्रमांचे शिक्षण दिले जाते ही आमच्यासाठी अभिमानास्पद बाब आहे, असे डॉ. विवेकी यांनी सांगितले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.