Thursday, December 26, 2024

/

चित्रपटगृह, जिम उद्यापासून 100 टक्के खुली

 belgaum

राज्यातील चित्रपटगृहे, योगा सेंटर्स, जिम आणि जलतरण तलाव उद्या शनिवार दि. 5 नोव्हेंबरपासून 100 टक्के प्रवेशासह पूर्ववत खुले ठेवण्यास परवानगी असेल. मात्र चित्रपट -नाट्यगृहात खाद्यपदार्थ आणि शीतपेय सेवनावर बंदी राहिल, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री के. सुधाकर यांनी आज शुक्रवारी दिली.

राज्यातील चित्रपटगृहे, योगा सेंटर्स, जिम आणि जलतरण तलाव 100 टक्के प्रवेशासह खुले करण्यास परवानगी असली तरी याठिकाणी भेट देणाऱ्या नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेले असावेत. मेळावे, धरणे आदींवरील निर्बंध कायम असून लग्नसमारंभासाठीचा नियम पूर्वीप्रमाणेच म्हणजे बंदिस्त जागेत 200 आणि खुल्या जागेत जास्तीत जास्त 300 लोक असा राहील, असेही मंत्र्यांनी सांगितले. राज्यातील हॉस्पिटलायझेशनचा रेट 2 टक्के इतका घटल्यामुळे वरीलप्रमाणे निर्बंध शिथलीकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे.

चित्रपटगृह, मल्टिप्लेक्स, नाट्यगृहं, रंगमंदिरं आणि सभागृहं 100 टक्के आसन क्षमतेसह कोरोनाचे नियम पाळून सुरू ठेवण्यास परवानगी असेल. मात्र विहित आसन क्षमतेत वाढ केली जाऊ नये. सदर ठिकाणी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेल्यांनाच थोडक्यात संपूर्ण लसीकरण झालेल्यांना प्रवेश दिला जावा. प्रत्येक व्यक्ती संसर्ग लक्षणे नसलेली असावी. प्रत्येक व्यक्तीचे प्रवेशद्वारावर थर्मल स्कॅनिंग केले जावे आणि हँड सॅनिटायझर वापरला जावा. सर्वांनी एन -95 मास्क वापरणे सक्तीचे असेल. नाटक-सिनेमाच्या संपूर्ण खेळादरम्यान मास्क घातलेला असावा आणि याची आयोजकांनी वेळोवेळी शहानिशा करावी. चित्रपटगृह अथवा नाट्यगृहाचे प्रत्येक खेळानंतर निर्जंतुकीकरण केले जावे. एसी अर्थात वातानुकूलित यंत्रणा सीपीडब्ल्यूडी मार्गदर्शक सूचीनुसार वापरली जावी.

जिम, योगा सेंटर्स आणि जलतरण तलाव कोरोना नियमांचे पालन करुन 100 टक्के क्षमतेने सुरू ठेवण्यास परवानगी असेल. मात्र विहित क्षमतेमध्ये वाढ केली जाऊ नये. सदर ठिकाणी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेल्यानाच थोडक्यात संपूर्ण लसीकरण झालेल्यांना प्रवेश दिला जावा प्रत्येक व्यक्ती संसर्ग लक्षणे नसलेली असावी. प्रत्येक व्यक्तीचे प्रवेशद्वारावर थर्मल स्कॅनिंग केले जावे आणि हँड सॅनिटायझर वापरला जावा.

जिम व योगा सेंटर्स याठिकाणी कोणाची तक्रार येणार नाही याची काळजी घेऊन शक्यतो खुल्या जागेत व्यायाम करावेत. दोन व्यक्तींमध्ये 2 मीटरचे (6 फूट) शारीरिक अंतर राखले जावे. प्रत्येक सत्र अथवा बॅचनंतर विश्रांतीगृह अथवा कपडे बदलण्याच्या खोलीचे निर्जंतुकीकरण केले जावे.

एसी अर्थात वातानुकूलित यंत्रणा सीपीडब्ल्यूडी मार्गदर्शक सूचीनुसार वापरली जावी. स्थानिक प्रशासनाने उपरोक्त सर्व ठिकाणी लक्ष ठेवून नियमांचे काटेकोर पालन केले जाईल याची काळजी घ्यावी. उपरोक्त नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.