रेल्वे लोहमार्गाच्या दुपदरी करण्याच्या कामामुळे तानाजी गल्ली -फुलबाग गल्ली येथील रेल्वे गेट शनिवार दि. 19 रोजी सकाळी 9 वाजल्यापासून सोमवार दि. 21 फेब्रुवारी रोजी रात्री 11 वाजेपर्यंत बंद असणार आहे. यामुळे नागरिक व वाहनधारकांनी अन्य मार्गाचा वापर करावा असे आवाहन नैऋत्य रेल्वे प्रशासनाने केले आहे.
बेळगाव शहरात सध्या लोहमार्गाच्या दुपदरी करणाचे काम धडाक्यात सुरू आहे. यापार्श्वभूमीवर तानाजी गल्ली जवळील रेल्वे गेट परिसरातील काम देखील हाती घेतले जात आहे. बेळगाव शहरात सहा रेल्वे गेट आहेत. यामध्ये पहिले , दुसरे, तिसरे, चौथे रेल्वे गेट तसेच तानाजी गल्ली व गांधीनगर येथील रेल्वे गेट यांचा समावेश आहे. या रेल्वे गेटातून प्रवाशांची सतत ये-जा सुरू असते. लोहमार्गाच्या कामासाठी दोन टप्प्यात पहिले रेल्वे गेट बंद ठेवण्यात आले होते.
तानाजी गल्ली येथील रेल्वे गेटच्या बाजूने नागरी वस्ती मोठ्या प्रमाणात आहे. येथील नागरिकांना ये-जा करण्यासाठी सतत रेल्वे मार्ग ओलांडावा लागतो. आता हा मार्ग तीन दिवस बंद असल्यामुळे नागरिकांना अन्य मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे.
वाहनधारकांना कपलेश्वर उड्डाणपूल तसेच छत्रपती शिवाजी उड्डाणपुलाचा वापर करावा लागणार आहे. रेल्वे प्रशासनाकडून लोहमार्गाच्या दुपदरी करण्याचे काम टप्प्याटप्प्याने सुरू आहे. यापूर्वी टिळकवाडी पहिले रेल्वे गेट येथील काम झाले आहे. सध्या तानाजी गल्ली येथील रेल्वे गेटवरील कामाचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानंतर इतर रेल्वे गेटवरील कामे देखील केली जाणार आहेत.