श्रीक्षेत्र सौंदत्ती यल्लमा येथे माघी पौर्णिमेच्या निमित्ताने यात्रेचे आयोजन केले जाते. या निमित्ताने देशभरातील अनेक भक्त सौंदत्ती येथे दाखल होतात. आता उद्या बुधवारी होणाऱ्या या माघी पौर्णिमा यात्रेसाठी आज मंगळवारपासूनच सौंदत्ती येथे भाविकांनी मोठी गर्दी केल्याचे पहावयास मिळत आहे.
कोरोना प्रादुर्भावाचा पार्श्वभूमी गेल्या वर्षभरापासून पूर्ण क्षमतेने भाविकांना सौंदत्ती-यल्लम्मा येथे येण्यास बंदी घालण्यात आली होती. गेल्या वर्षी माघी पौर्णिमेला मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले होते.
मात्र यंदा कोरोना परिस्थिती कांहीशी निवळली असल्यामुळे जिल्हा प्रशासनाने पुन्हा एकदा श्री यल्लमा देवस्थान भाविकांसाठी खुले केले असून उद्या बुधवारी होणाऱ्या माघी पौर्णिमेच्या निमित्ताने या ठिकाणी आजपासूनच भाविकांची मोठी गर्दी झाली आहे.
माघी पौर्णिमेला उत्तर कर्नाटकात भारत पौर्णिमा असेही म्हंटले जाते. या पौर्णिमेच्या निमित्ताने यल्लम्मा डोंगरावर यात्रा भरविण्यात येते. या यात्रेच्या निमित्ताने सध्या डोंगर परिसर भाविकांनी फुललेला असून परिसरातील दुकानेही सजली आहेत. कुंकू, भंडारा, कापूर, फळे, मिठाई यासह पुजेच्या साहित्याची दुकाने डोंगर परिसरात थाटण्यात आली आहेत. गेल्या वर्षभरापासून बंद असलेल्या देवस्थानामुळे येथील व्यावसायिक अडचणीत आले होते. मात्र आता मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले असून त्यामुळे मोठी उलाढाल होण्याची आशा येथील व्यावसायिकांमध्ये व्यक्त होत आहे.
श्री रेणुका देवीच्या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी ठरावीक मार्ग निश्चित करण्यात आला असून ऊगरगोळ, जोगनभावी तसेच इतर भागात बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत. याठिकाणी सुरक्षेच्या कारणास्तव पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला असून 52 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेराची व्यवस्थाही करण्यात आली आहे. तसेच पिण्याचे पाणी, वीज, निवारा, शौचालयं आदी आवश्यक सर्व सुविधाही पुरविण्यात आल्या आहेत, अशी माहिती देवस्थान प्रभारी कार्यकारी अधिकारी डॉ ईश्वर उळागड्डी यांनी दिला आहे. माघी पौर्णिमेनिमित्त देशभरातील विविध भागातून भाविक सौंदत्ती येथे दाखल झाले असून त्यांच्यासाठी देवस्थान समिती आणि जिल्हा प्रशासनाने आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविण्याची व्यवस्था केली आहे.