विधानसभेच्या ४० जागांसाठी १४ फेब्रुवारी रोजी निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकीसाठी राष्ट्रीय पक्षांनी कंबर कसली असून कर्नाटक काँग्रेस कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी थेट गोव्यात दाखल होत काँग्रेसचा भव्य प्रचार केला आहे.
बुधवारी विधानसभा निवडणूक लढविणारे काँग्रेसचे उमेदवार अमन लोटलेकर यांच्यासाठी मतयाचना करत म्हापसा आणि आल्डोना मतदार संघात प्रचारात सहभाग घेतला. गोव्यात असलेल्या अल्पसंख्यांक कन्नड मतदारांना काँग्रेस उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन सतीश जारकीहोळी यांनी केले.
याचप्रमाणे अनेक विविध मतदार संघात केपीसीसी कार्याध्यक्षांनी प्रचार केला. ११ आणि १२ फेब्रुवारी रोजी गोव्यात प्रचाराचे आयोजन करण्यात आले असून एकूण २० मतदार संघात प्रचार हाती घेतला आहे. गोवा राज्यातील एकूण ४० विधानसभा मतदार संघात ३७ जागांवर काँग्रेसचे उमेदवार निवडणूक लढवीत आहेत.
या प्रचारादरम्यान काँग्रेस उमेदवार सुधीर कांदोळकर, आल्डोना मतदार संघाचे उमेदवार कार्लोस फेरेरो, मापुसा ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष शशांक नार्वेकर, बागलकोट जिल्हा काँग्रेस नेते लक्ष्मण मालगी, बसवराज तळवार, हणमंत डोणी, मंजुनाथ बावीदंडी, जयराज हादिकार, सुनील हनम्मण्णावर यांनी सहभाग घेतला.