राष्ट्रीय पोलिओ लसीकरण दिनानिमित्त बेळगाव रोटरी परिवार आणि जिल्हा आरोग्य खाते यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या रविवार दि. 27 फेब्रुवारी रोजी बृहत पोलिओ प्रतिबंधक लसीकरण मोहीम हाती घेण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी बेळगाव शहर परिसरात एकूण 174 पोलिओ लसीकरण केंद्रे उभारण्यात येणार आहेत.
सदर मोहिमेअंतर्गत रविवारी एका दिवशी 42000 बालकांचे पोलिओ प्रतिबंधक लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे. गेल्या 7 वर्षात भारतामध्ये नव्याने एकही पोलिओ रुग्ण आढळून आलेला नाही. रोटरी इंटरनॅशनल आणि भारत सरकारने संयुक्तरीत्या पोलिओचे भारतातून उच्चाटन केले आहे.
तथापि शेजारील देशांमध्ये पोलिओचे कांही रुग्ण आढळून आल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून भारतामध्ये लहान मुलांसाठी पोलिओ प्रतिबंधक लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे.
बेळगावमध्ये 8 रोटरी क्लब आणि एक इनरव्हील क्लब आहे. रोटरी क्लब आणि इनरव्हील क्लबच्या पदाधिकारी व सदस्यांकडून बेळगाव शहरातील लसीकरण केंद्रांचे व्यवस्थापन तर उर्वरित केंद्रांचे व्यवस्थापन जिल्हा आरोग्य कार्यालय आणि महापालिका सांभाळणार आहे. पोलिओ लसीकरणाबाबत जनजागृती करण्यासाठी आज सायंकाळी 4:30 वाजता शहरातील धर्मवीर संभाजी चौक येथून शहरातील प्रमुख मार्गांवर पोलिओ रॅली काढण्यात येणार आहे.
रविवारी 27 फेब्रुवारी रोजी आयोजित केलेल्या पोलिओ प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचे उद्घाटन सकाळी 8 वाजता बीम्स हॉस्पिटल येथे बेळगावच्या उभय आमदारांच्या हस्ते होणार आहे. सदर लसीकरण मोहीमेमध्ये बेळगाव महापालिकेचा सक्रिय सहभाग असणार आहे.