तात्काळ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा या मागणीसह नियमीत बससेवा सुरू करावी, या मागणीसाठी आज राणी चन्नम्मानगर येथील संतप्त रहिवासी आणि शालेय विद्यार्थिनींनी आंदोलन छेडले.
तात्काळ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा या मागणीसह नियमीत बससेवा सुरू करावी, या मागणीसाठी आज शुक्रवारी सकाळी राणी चन्नम्मानगर येथील श्री लक्ष्मी मंदिरानजीक स्थानिक रहिवासी आणि शालेय विद्यार्थिनींनी आंदोलन केले. राणी चन्नम्मानगर येथे परिवहन मंडळाची नियमित बससेवा नसल्यामुळे येथील शालेय विद्यार्थी -विद्यार्थिनींचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्याचप्रमाणे बस सेवा नियमित नसल्यामुळे येथील सर्वसामान्य नागरिकांना देखील मोठी गैरसोय होते. त्यांना बस अभावी शहरात ये -जा करताना बराच मनस्ताप सहन करावा लागतो.
बस सेवेच्या समस्या व्यतिरिक्त गेल्या अनेक दिवसापासून चन्नम्मानगर परिसरात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. पाण्याअभावी अतिशय हाल होत असल्यामुळे आजच्या आंदोलनाप्रसंगी विशेष करून महिलावर्गाकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. यासंदर्भात बोलताना एका महिलेने सांगितले की, पाणी टंचाई बाबत पाणीपुरवठा मंडळ आणि एल अँड टी कंपनीकडे वारंवार तक्रार करून देखील त्याची दखल घेतली जात नाही. या ठिकाणच्या व्हॉल्वमनकडे विचारणा केल्यास त्याच्याकडून उद्धट उत्तरे मिळतात. आम्ही महापालिकेचे सर्व कर भरतो. पाणीटंचाईमुळे बाहेरून आणलेले पाणी पिऊन आरोग्य बिघडत आहे. औषध पाण्याला पैसे खर्च करावे लागत आहे. बाजारातून सीलबंद पिण्याचे पाणी खरेदी करून आणावे लागत असल्यामुळे तो भुर्दंड वेगळा बसत आहे असे सांगून या पद्धतीने पाणीपट्टी वगैरे सर्व कर भरून देखील आमच्यावर अन्याय होत आहे, असे त्या महिलेने स्पष्ट केले.