‘लाल किल्ल्यावर भगवा फडकवू’ असे वादग्रस्त विधान करणाऱ्या ग्रामीण विकास आणि पंचायत राजमंत्री के. एस. ईश्वराप्पा यांची राज्य मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी करत बेळगाव जिल्हा काँग्रेसतर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढून निवेदन सादर करण्यात आले.
दिल्ली येथील लाल किल्ल्यावर भगवा फडकवू असे वादग्रस्त विधान करून ग्रामविकास मंत्री ईश्वराप्पा यांनी सर्वांचा रोष ओढवून घेतला आहे. आता हा विषय ताकदीने उचलून धरण्याचा निर्धार राज्य काँग्रेसने केला आहे. विधिमंडळ अधिवेशनात काँग्रेसने दोन्ही सभागृहात हा मुद्दा उचलून सत्ताधारी भाजपची कोंडी केली आहे. आता या विषयाला व्यापक करण्यासाठी बेळगावसह संपूर्ण राज्यात आंदोलन हाती घेण्यात आले आहे. या आंदोलनाचा एक भाग म्हणून बेळगाव जिल्हा काँग्रेसतर्फे अध्यक्ष विनय नावलगट्टी यांच्या नेतृत्वाखाली आज सोमवारी सकाळी शहरात भव्य मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी घोषणा देणाऱ्या मोर्चेकऱ्यांनी हातात धरलेले मंत्री ईश्वराप्पा यांचा छायाचित्रासह निषेधाचे फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.
जिल्हाधिकारी कार्यालय आवारात पत्रकारांशी बोलताना काँग्रेस जिल्हा अध्यक्ष विनय नावलगट्टी म्हणाले की, देशातील लहान बालकापासून वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येक जण देशासाठी बलिदान देण्यास सिद्ध आहे. राष्ट्रध्वज हा देशाच्या गौरवाचे प्रतीक असतो.
तथापि देशाची अखंडता आणि गौरव अबाधित राखण्याची घटनेवर हात ठेवून शपथ घेणाऱ्या वाचाळ मंत्री के. एस. ईश्वराप्पा यांनी लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज काढून केशरी ध्वज लावण्याचे केलेले वक्तव्य देशद्रोही आहे.
तेंव्हा त्यांची राज्य मंत्रिमंडळातून तात्काळ उचलबांगडी करण्यात यावी अशी मागणी करून या संदर्भात सर्व तालुक्याचे तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्यपालांना निवेदन धाडण्यात येणार असल्याचे नावलगट्टी यांनी सांगितले. यावेळी जिल्हा काँग्रेसच्या अन्य पदाधिकाऱ्यांसह बहुसंख्य स्त्री-पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते.