केएलई प्रभाकर कोरे हॉस्पिटल येथील पार्किंगचे कंत्राट मिळालेल्या कंत्राटदाराकडून मनमानी केली जात असून पार्किंगचे पैसे घेतल्याची पावतीच दिली जात नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
केएलई प्रभाकर कोरे हॉस्पिटल हे बेळगावातीलच नाही तर देशभरातील नामवंत हॉस्पिटल्स पैकी एक मानले जाते. या हॉस्पिटलकडून उच्चभ्रू लोकांपासून तळागाळातील रुग्णांपर्यंत सर्वांना वैद्यकीय सेवा पुरविली जाते.
दर्जेदार वैद्यकीय सेवेसाठी हे हॉस्पिटल सुपरिचित असले तरी या ठिकाणी सर्वसामान्यांसाठी असलेल्या सुविधांचा गैरफायदा उठण्याचे प्रकार वारंवार संबंधित खाजगी कंत्राटदारांकडून केले जात असल्याचा आरोप होत असून यामुळे हॉस्पिटलची प्रतिमा मलीन होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सध्या सदर हॉस्पिटलच्या पार्किंग कंत्राटदाराकडून दुचाकी वाहन पार्किंगच्या ठिकाणी वाहने पार्क करणाऱ्या नागरिकांकडून पैशाची लुट केली जात असल्याचा आरोप केला जात आहे.
सर्वसामान्यपणे सर्वत्र दुचाकी पार्किंगसाठी 10 रुपये शुल्क आकारले जाते, तथापि केएलई हॉस्पिटलच्या ठिकाणी पार्किंगचा हा दर 20 रुपये आहे. ही शुल्क आकारणी करताना रीतसर पावती देणे मात्र सोयीस्कररित्या टाळले जात असल्याच्या तक्रारी आहेत.
यासंदर्भात आज शुक्रवारी हॉस्पिटलमध्ये आपल्या रुग्णाला भेटण्यास आलेल्या एका जागरूक नागरिकाने जाब विचारला असता पार्किंगच्या ठिकाणी वसुलीसाठी नेमलेल्या व्यक्तीने आम्हाला फक्त पैसे घेण्यास सांगितण्यात आले आहे असे स्पष्ट केले. मात्र दिलेल्या पैशाची पोचपावती न मिळाल्याने संबंधित व्यक्तीने आक्रमक पवित्रा घेतला असता अखेर त्याला 20 रुपयांची पोचपावती देण्यात आली.
हा प्रकार लक्षात घेता थोडक्यात केएलई प्रभाकरराव कोरे हॉस्पिटलच्या ठिकाणी असलेल्या वाहन पार्किंगच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होत असून याकडे संबंधितांनी गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे.