बेळगाव : बेळगाव जिल्हा वाल्मिकी समाजाच्यावतीने आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेत वाल्मिकी समाजाला आरक्षण मिळावे असा आग्रह करत कर्नाटकातील भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल चढविण्यात आला.
या पत्रकार परिषदेत भाजप सरकारवर ताशेरे ओढण्यात आले. भाजप सरकारने सत्तेवर आल्यापासून आतापर्यंत वाल्मिकी समाजाकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. ७.५ टक्के अधिक आरक्षण देण्यासंदर्भात आश्वासन देण्यात आले होते. न्यायमूर्ती नागमोहनदास यांच्या नेतृत्वाखाली एकसदस्यीय आयोगाची नेमणूक देखील करण्यात आली आहे. या आयोगाने दिलेल्या अहवालानुसार अधिक आरक्षण देण्याचे आश्वासन तत्कालीन मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी दिले होते.
परंतु या अहवालानंतर दीड वर्ष उलटून गेले तरी अद्याप आरक्षण जाहीर करण्यात आले नाही. बी एस येडियुरप्पा यांच्यानंतर बसवराज बोम्मई यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाली परंतु सातत्याने बोम्मई सरकारच्या नेतृत्वाखालील सरकारने वाल्मिकी समाजाला केवळ खोटी आश्वासन देऊन वेळकाढूपणाचे धोरण अवलंबिले आहे. कर्नाटकात भाजपाची सत्ता येण्यासाठी वाल्मिकी समाजाचे मोठे योगदान आहे. फ्रिडम पार्क येथे वाल्मिकी समाजाच्या वतीने प्रसन्नानंद महास्वामी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन पुकारण्यात आले असून आगामी तीन महिन्यात आरक्षण जाहीर न केल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांना पुन्हा मंत्रिपद देण्यात येऊ नये अशीही मागणी या पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे. शिवाय भाजप सरकार हे जातीयवादी सरकार असून दलित, गरीब, मुस्लिम यासह अनेक समाजावर अन्याय करणारे अमानवी सरकार असल्याचा आरोपही करण्यात आला.
कर्नाटकात ६० ते ९० लाख जनता वाल्मिकी समाजातील आहे. घटनेनुसार आपल्या समाजाला आरक्षण मिळावे, घटनेनुसार हक्क मिळावेत यासाठी आम्ही आंदोलन करत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. वाल्मिकी समाज शिक्षण आणि उद्योग क्षेत्रात पिछाडीवर आहे. अनेक विद्यार्थी सुविधांपासून वंचित आहेत. कर्नाटकात भाजपाची सत्ता येण्यासाठी वाल्मिकी समाज कारणीभूत असून मुख्यमंत्र्यांनी याची जाणीव ठेवून आरक्षण द्यावे, अशी मागणी करण्यात आली. आरक्षण न दिल्यास आगामी काळात विधानसभा, विधानसौधला घेराव घालून भव्य आंदोलन छेडण्याचा इशारा या पत्रकार परिषदेत देण्यात आला.
या पत्रकार परिषदेला बेळगाव जिल्हा वाल्मिकी संघाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.