‘हिजाब आणि केशरी शाल’ वाद निस्तरण्यास सरकार सक्षम आहे. तेंव्हा हिजाब आणि केशरी शाल विचारांशी संबंधित संदेश आणि पोस्टर्स सोशल मीडियावर अपलोड केल्यास शांतता भंग व धार्मिक तेढ निर्माण करण्याचा आरोप ठेवून संबंधितांवर कठोर फौजदारी कारवाई केली जाईल, असा इशारा देण्याबरोबरच मुलांच्या परीक्षा जवळ आल्या असल्याने सदर गैरप्रकार कोणीही करू नयेत. मॉरल पोलिसिंग करू नये, असे आवाहन पोलीस आयुक्त डाॅ. एम. बी. बोरलिंगय्या यांनी केले आहे.
हिजाब प्रकरणावरून उडुपी येथील सरकारी पदवीपूर्व महाविद्यालयातील वादानंतर त्याची ठिणगी राज्यात पडली आहे. कर्नाटकासह संपूर्ण देशात हा चर्चेचा विषय झाला आहे. या घटनेनंतर इतर जिल्ह्यात धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या घटना घडण्यासह दगडफेकीचे प्रकार घडले आहेत.
या पार्श्वभूमीवर आज शनिवारी पोलीस आयुक्तांनी शहरातील हिंदू आणि मुस्लिम धर्मियांची बैठक बोलावली होती. सदर बैठकीत पोलीस आयुक्त डाॅ. बोरलिंगय्या यांनी उपरोक्त इशारा वजा आवाहन केले.
कर्नाटकातील हिजाब वादाशी संबंधित एका याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने तातडीची सुनावणी फेटाळून लावली. आम्ही योग्य वेळी हस्तक्षेप करू अशी टिप्पणीही न्यायालयाने केली आहे. त्याचप्रमाणे सदर प्रकरण हाताळण्यास सरकार सक्षम आहे. मात्र दरम्यानच्या काळात मुलांच्या परीक्षा तोंडावर आल्या आहेत ते लक्षात घेऊन हिजाब आणि केशरी शाल विचारांशी संबंधित संदेश आणि पोस्टर्स व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम आदी सोशल मीडियावर अपलोड करण्याद्वारे सामाजिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला जाऊ नये. असे प्रकार करणाऱ्या विरुद्ध कठोर फौजदारी कारवाई केली जाणार आहे.
तेंव्हा प्रत्येकाने याचे भान बाळगावे. पोलिसांनी गुन्हे दाखल केल्यास संबंधिताच्या भावी कारकिर्दीला कलंक लागू शकतो हे प्रत्येकाने ध्यानात ठेवावे. याबाबतीत कोणीही मॉरल पोलिसिंग करू नये. यासंदर्भात बैठकीस उपस्थित असलेल्यांनी समाजात जनजागृती करावी, असे आवाहन पोलीस आयुक्तांनी हिंदू धर्मियांच्या बैठकीत केले.
बैठकीत झालेल्या चर्चेत प्रारंभीच प्रतिष्ठित व्यापारी व सामाजिक कार्यकर्ते विकास कलघटगी यांनी मॉरल पोलिसिंगचा मुद्दा उपस्थित केला आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या पोलीस आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिल्या. तसेच हिजाब वाद अधिक चिघळू नये याबाबत आवश्यक सूचना केल्या. याप्रसंगी श्रीराम सेना हिंदुस्तानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर, रवी कोकितकर, सुनील जाधव, विजय जाधव आदी उपस्थित होते.
हिंदू धर्मियांच्या बैठकीनंतर पोलीस आयुक्तांनी मुस्लिम समाजाच्या प्रमुख नेत्यांची बैठक घेऊन हिजाब आणि केशरी शाल वाद चिघळला जाऊ नये या संदर्भात मार्गदर्शन केले. हिजाब आणि केशरी शाल विचारांशी संबंधित मॉरल पोलिसिंग कोणीही करू नये. त्यासंदर्भातील संदेश आणि पोस्टर्स व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम आदी सोशल मीडियावर अपलोड केल्यास शांतता भंग व धार्मिक तेढ निर्माण करण्याचा आरोप ठेवून संबंधितांवर कठोर फौजदारी कारवाई केली जाईल, असा इशारा देण्याबरोबरच मुलांच्या परीक्षा जवळ आल्या असल्याने सदर गैरप्रकार कोणीही करणार नाही याची काळजी मुस्लिम समाज प्रमुखांनी घ्यावी, असे आवाहन पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांनी मुस्लिम बांधवांच्या बैठकीत केले.